भोपाळ : लग्न (Marriage) झाल्यानंतर नवरी सासरी जाण्याची रित असते. यावेळी पाठवणी केली जाते. नवरीची पाठवणी हा जणू एक सोहळाच असतो. माहेरचं घर सोडून सासरी जाताना नवरी मुलगी रडते. यावेळी रडू येत नसेल तर, काय करावं? याचा विचार करुन एका व्यक्तीने चक्क रडण्याचा क्रॅश कोर्स सुरु केला आहे. रडण्याची 'प्रॉपर ॲक्टिंग' शिकायची असेल, तर भोपाळमध्ये त्यासाठी खास एक क्रॅश कोर्स सुरू करण्यात आला आहे. हा 7 दिवसांचा क्रॅश कोर्स आहे. या एक आठवड्याच्या कोर्समध्ये नवरी आणि तिच्या मैत्रिणी सहभागी होऊ शकतात.
सासरी जाताना नवरीनं कसं रडावं?
एखाद्या मुलीचं लग्न असेल, तर ती सासरी निघताना मुलीचे आई-वडील, भाऊ-बहिण, मैत्रिणीसह इतर नातेवाईकांचा अश्रूचा बांध फुटतो. सुरुवातीला डोळ्यात पाणी येत मात्र, काही वेळानंतर ओक्साबोक्शी रडू कोसळतं. काही जण अशाप्रकारे रडू लागतात की, लोक नवरीची पाठवणी करताना रडत आहेत की एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यावर रडत आहेत, असा प्रश्न उपस्थित होतो. ही ओव्हरॲक्टिंग टाळण्यासाठी भोपाळमधील एका महिलेने नवरी आणि तिच्या मैत्रिणींसाठी रडण्याचा क्रॅश कोर्स सुरु केला आहे.
रडण्याचा 7 दिवसांचा क्रॅश कोर्स
भोपाळच्या राधिका राणीने हा रडण्याचा क्रॅश कोर्स सुरू केला आहे. नवरीच्या पाठवणीचा हा क्षण अत्यंत सेन्सिटिव्ह असतो, हा क्षण हास्यास्पद होऊ नये, हा या कोर्समागचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. हा कोर्स सुरू करण्यामागच्या नेमकी प्रेरणा कशी मिळाली याबाबत विचारल्यावर राधिका राणीने सांगितलं की, त्या एका लग्न समारंभात गेल्या होत्या. नवरीच्या बिदाई म्हणजेच पाठवणीची वेळ आली आणि नवरीच्या मैत्रिणी चिंतेत होत्या की आता आता रडायचं कसं? आधी तू रडायला सुरुवात कर असं, नवरी आणि तिच्या मैत्रिणी सगळ्या एकमेकींना म्हणत होत्या.
कल्पना कशी सुचली?
तू रडायला सुरुवात कर त्यानंतर आम्ही तुझ्यामागून रडायला सुरुवात करतो, असा सगळ्यांचा संवाद सुरु होता. पण, कोणालाच रडू येत नव्हतं. हा प्रकार बराच वेळ चालला. त्यानंतर एका मैत्रिणीने कसंबसं रडायला सुरुवात केली. पण, तिने यावेळी इतकी भयानक ओव्हरॲक्टिंग केली की, नवरी रडण्याऐवजी स्वतःच हसू लागली. यानंतर नवरीसह इतर सर्व मंडळीही लोक पोट धरून हसू लागले आणि पाठवणीचा संवेदनशील क्षणाचं रुपांतर हास्यमय वातावरणात झालं.
हास्यास्पद घटना टाळण्यासाठी कोर्सला सुरुवात
राधिका राणीने पुढे सांगितलं की, अलीकडे लग्नानंतर नवरीच्या पाठवणीच्या वेळी रडणं ही सगळ्यात कठीण समस्या झाली आहे. त्यासाठी त्यांनी हा रडण्याचा क्रॅश कोर्स सुरु केला आहे. राधिका राणी एक पथनाट्य कलाकार असून, नवरीच्या पाठवणी वेळी हास्यास्पद घटना टाळण्यासाठी तिने या कोर्सला सुरुवात केली आहे.
दरम्यान, रडण्याच्या या क्रॅश कोर्सची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे. काही दिवसांत हा क्रॅश कोर्स खूप चर्चेत आला आहे. इतकंच काय तर हा रडण्याचा क्रॅश कोर्स करण्यासाठी नवरीसह तिच्या मैत्रिणी आणि कुटुंबियांची रांग लागली आहे. नवरीसह नवरीच्या मैत्रिणी आणि तिचे भाऊ या क्रॅश कोर्समध्ये प्रवेश घेताना दिसत आहेत.