Job Interview : आजच्या काळात ऑफिसमधलं वर्क कल्चर फारंच बदलली आहेत. सोशल मीडियावर या संबंधित अनेक किस्से आपल्याला ऐकायला, पाहायला मिळतात. पण, अनेक ठिकाणी अजूनही परिस्थिती इतकी विचित्र आहे की तुम्हालाही जाणून आश्चर्य वाटेल. 


अलीकडेच एका महिलेने तिच्याबरोबर घडलेल्या घटनेबद्दल सांगितले तेव्हा लोक आश्चर्यचकित झाले. प्रतीक्षा जिचकर (Pratiksha Jichkar) असं या महिलेचं नाव असून तिने लिंक्डइनवर (Linked in) नोकरीसाठी मुलाखत देताना आलेला एक विचित्र अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'नोकरीची संधी देणाऱ्यांनी मला नोकरी न देण्याचे विचित्र कारण दिले.'


मुलाखतीच्या अंतिम फेरीत नाकारले कारण...


जगभरातील कामाच्या ठिकाणी वर्णभेद हा एक अतिश गंभीर मुद्दा आहे. प्रतीक्षाची पोस्ट पाहिली तर या परिस्थितीत अजून कशी सुधारणा झाली नाही हे समजू शकते. तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "मुलाखतीच्या अंतिम फेरीत मला नाकारण्यात आलं कारण माझ्या त्वचेचा रंग बाकीच्या टीम मेंबर्सपेक्षा गोरा आहे."


प्रतीक्षाने पुढे लिहिलं की, मुलाखतीच्या तीन फेऱ्या आणि असाईनमेंटच्या एका फेरीनंतर सर्व संबंधित कौशल्ये, पात्रता आणि अनुभव असतानाही मी या पदासाठी योग्य नव्हते. कारण माझ्या त्वचेचा रंग सध्याच्या टीमपेक्षा जास्त गोरा होता. यावरून टीममध्ये कोणतेही मतभेद नसावेत अशी नियुक्ती करणाऱ्यांची इच्छा होती आणि त्यामुळे त्यांनी मला नोकरी देण्यास नाकारलं. हे फारच विचित्र आहे."


'तुमच्या त्वचेचा रंग गोरा आहे...'






प्रतीक्षाने तिच्या पोस्टमध्ये कंपनीकडून आलेल्या मेलचा स्क्रिनशॉटही शेअर केला आहे. त्यात लिहिले आहे की, 'नोकरीच्या भरती प्रक्रियेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. पण दुर्देवाने आम्ही तुम्हाला कामावर घेऊ शकत नाही. तुमचे कौशल्य आणि पात्रता सर्व काही ठीक आहे. पण, आम्ही सर्वांसाठी समान संधी मिळावी याची काळजी घेतो. तुमच्या त्वचेचा रंग आमच्या टीमपेक्षा किंचित गोरा आहे आणि आम्हाला टीममध्ये यावरून कोणत्याही प्रकारचा वाद नको म्हणून आम्ही तुम्हाला नोकरी देऊ शकत नाही.'


प्रतीक्षाने पोस्टसह लिहिले आहे की,' येथे आपण विविधता, सर्वसमावेशकता, स्थिरता याबद्दल बोलतो आहोत आणि दुसरीकडे मात्र, रंग, पंथ, धर्म आणि इतर अनेक पूर्वग्रहांच्या आधारावर लोकांचा न्याय करत आहोत. प्रतीक्षाने लिंक्डइनवर शेअर केल्यावर ही पोस्ट ट्विटरवरही पोहोचली. 


ट्विटरवर यूजर्सकडूनही संताप व्यक्त


प्रतीक्षाला तिच्या रंगामुळे ज्या प्रकारे अनुभवाला सामोरे जावे लागले ते पाहून ट्विटरवर यूजर्सही आश्चर्यचकित झाले. यावर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने म्हटलंय की, 'कधी लोकांना गडद रंगाची समस्या असते तर कधी गोऱ्या रंगाची. कामाच्या आधारावर निवड केली पाहिजे. ही कसली वाईट गोष्ट आहे.' तर, दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, 'हे चुकीचं आहे. यासाठी तुला कंपनीला जाब विचारला पाहिजे.'