पुणे: भारतीय बाजारपेठा चीनी वस्तूंनी व्यापलेला असताना, आता चीनी व्यापारी थेट शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले आहेत. चीनच्या फळविक्रेत्याने थेट इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी गाठून, शेतकऱ्याने पिकवलेली डाळिंबं विकत घेतली.

चीनवरुन गलांडवाडीत

आपल्या देशात शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल आहे. मात्र तरीही काळ्या आईची सेवा करणारे हेच शेतकरी, नेहमीच त्यांच्यातील जिद्दीची चुणूक दाखवत असतात. अशीच जिद्दची चुणूक पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी येथील शेतकऱ्याने दाखवली.



दादा जाधव या शेतकऱ्याने डाळिंबाचे दर्जेदार उत्पादन घेत थेट चिनी व्यापाऱ्यांना भुरळ घातली. चीनी व्यापारी थेट डाळिंबाची बाग पाहाण्यासाठी आणि डाळिंब खरेदी करण्यासाठी, हजारो मैलाचा प्रवास करुन शेतकऱ्याच्या बांधावर आले आहेत.

चीनमधील फळांचे व्यापारी
मिस्टर हू आणि मिसेस हूआये हे चीनमधील फळांचे व्यापारी आहेत. भारतातील चांगल्या प्रतीचा माल घेऊन, तोच माल ते मलेशिया, हाँगकाँगला पाठवतात. त्यासाठी दिल्लीचे व्यापारी अमन आदर्शी हे त्यांना मदत करतात.

आज ते पुणे जिह्यातील इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नंबर एक येथील दादा जाधव यांच्या शेतात डाळिंबाची खरेदी करण्यासाठी आले होते.

दादा जाधव, शेतकरी

दोन एकरात डाळिंब शेती
दादा जाधव यांनी जैविक पद्धतीने दोन एकर बागेत डाळिंबाची बाग लावली आहे. आज प्रत्येक झाडास 50 किलोहून अधिक फळे लागलेली आहेत. बाग आणि बागेतील डाळिंब एवढ्या उत्कृष्ट प्रतीची आहेत की पंचक्रोशीतील शेतकरी ही बाग पाहण्यासाठी त्यांच्या शेतात गर्दी करतात.

जैविक पध्दतीने खते दिल्याने, आज त्यांनी पिकवलेली डाळिंब सातासमुद्रापार जात आहेत.

जैविक पध्दतीने पिकवलेली डाळिंब दीड महिन्यांपर्यंत टिकू शकतात. शिवाय ही डाळिंब खूपच उत्तम  आहेत. त्यामुळेच आम्ही ही डाळिंब खरेदी करण्यासाठी इंदापुरात आल्याचं, मिस्टर हू यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालास भारतीय बाजारपेठेत कवडीमोड किंमत मिळते. पण त्याच शेतमालाला चीनी व्यापाऱ्यांकडे मात्र भरघोस भाव दिला जात आहे.