मुंबई : प्रेमात वेडापिसा झालेल्या तरुणाने आपल्या गर्लफ्रेण्डसाठी पोलिस आणि रेल्वे यंत्रणेला वेठीस धरण्यातही मागे-पुढे पाहिलं नाही. गर्लफ्रेण्डचे वडील तिला बळजबरीने उत्तर प्रदेशला नेत असल्यामुळे तिला रोखण्यासाठी तरुणाने ट्रेनमध्ये बॉम्ब असल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली.


उत्तर प्रदेशला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बॉम्ब पेरल्याचा खोटा फोन कॉल तरुणाने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला केला. पोलिस आणि रेल्वे यंत्रणा तातडीने कामाला लागल्या, तेव्हा ही अफवा असल्याचं समोर आलं. 'मिड-डे' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

आरोपी तरुण हा मालाड पूर्वेकडील पठाणवाडीत राहणाऱ्या 17 वर्षीय तरुणीच्या प्रेमात होता, अशी माहिती कुरार पोलिसांनी दिली. 5 मे रोजी संबंधित तरुणी लखनौ एक्स्प्रेसने वडिलांसोबत उत्तर प्रदेशला जाणार असल्याचं समजलं, तेव्हा त्याने ट्रेनमध्ये बॉम्ब असल्याचा खोटा कॉल पोलिसांना केला.

विशेष म्हणजे बॉम्ब पेरणारी व्यक्ती म्हणून गर्लफ्रेण्डच्या वडिलांचं नाव, राहण्याचा पत्ता आणि रिझर्व्हेशन तिकीटाचा तपशीलही पुरवला. पोलिसांनी त्यांच्या घरी धाव घेताच व्यवसायाने टेलर असलेला संबंधित इसम मुलीसोबत यूपीला जाण्याच्या तयारीत असल्याचं त्यांना समजलं.

पोलिसांनी त्यांच्या सामानाची पूर्ण झडती घेतली, मात्र काहीच संशयास्पद आढळलं नाही. अखेर तरुणीने आपल्या बॉयफ्रेण्डचा प्लान सांगितला. आरोपीचा मोबाईल नंबर तपासून पाहिला असता तो स्वीच ऑफ लागत आहे. त्यामुळे त्याने शहराबाहेर पलायन केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी त्याचं नाव उघड केलं नसलं, तरी त्याला शोधून काढू असा विश्वास व्यक्त केला आहे.