KDMC Hospital Woman Death: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शक्तीधाम रुग्णालयामध्ये एका 30 वर्षीय महिलेचा डॉक्टरांच्या चुकीमुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शांतीदेवी मौर्या ही महिला किडनी स्टोनचे ऑपरेशन करण्यासाठी शक्तीधाम रुग्णालयात दाखल झाली होती. सोमवारी दुपारी तीन वाजता तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी डॉक्टरांनी तिला भुलीचे इंजेक्शन दिले. यानंतर शांतीदेवी मौर्या यांची प्रकृती खालावली. त्यांची प्रकृती बिघडत असल्याने त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. मात्र, रुग्णवाहिका रस्त्यात असताना शांतीदेवी मौर्या यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. 

शांतीदेवी मौर्या यांना दिशाभूल करुन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचा दावा नातेवाईकांनी केला.  धक्कादायक बाब म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये आयसीयू सुविधा नसतानाही महिलांवर शस्त्रक्रिया केल्या जातात. या शस्त्रक्रिया दरम्यान एखाद्या महिलेची प्रकृती खालावली तर तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले जाते. एक महिन्यापूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये प्रसूती दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा महापालिकेच्या रुग्णालयात महिलेचा मृत्यू झाला आहे.

शांतीदेवी यांचे पती यांनी असे म्हटले आहे की, पत्नीच्या पोटात दुखत असल्याने किडनी स्टोन असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. या ठिकाणी किडनी स्टोनचे ऑपरेशन केले जाईल असे सांगून रुग्णालयात शांतीदेवीला शुक्रवारी ऑपरेशन साठी दाखल करण्यात आले. शांतीदेवीची तब्येत व्यवस्थित नसल्याने शांतीदेवीला रुग्णालयाकडून रक्त चढवण्यात आले. तीन दिवस तिच्यावर उपचार केले प्रकृती स्थिर झाल्यानंतर डॉक्टरांनी सोमवारी दुपारी तीन वाजता कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन करण्यासाठी ऑपरेशन थेटरमध्ये घेऊन गेले. भुलीचे इंजेक्शन दिल्यावर तब्येत खालावली. कल्याण डोंबिवली मनपा रुग्णालयात आयसीयू कक्ष नसल्याने शांतीदेवी हिला डॉक्टरांनी परस्पर कल्याणच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी घेऊन जात असताना शांतीदेवीचा रस्त्यातच मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर  डॉक्टरांनी शांतीदेवीच्या नातेवाईकांना सांगितले सही करा, हिला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जात आहोत, डॉक्टरांनी  सर्व कागदोपत्री प्रक्रिया रुग्णवाहिकेत पूर्ण केली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.

पेट मे पत्री है, बताकर... शांतीदेवींच्या नवऱ्याचा दावा

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार आमच्या रुग्णालयामध्ये कुटुंब नियोजन महिला प्रसूती असे उपचार केले जातात, किडनी स्टोनचे ऑपरेशन याठिकाणी केले जात नाही, असे सांगितले. शांतीदेवीला कुटुंब नियोजनासाठी तिला रुग्णालयात दाखल केले असल्याचे सांगितले. मात्र,शांतीदेवी मौर्या यांच्या पतीने आरोप केला आहे की, पोटात दुखत असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 'पेट मे पत्री है वो पत्री निकालने के लिए भरती किया गया था, भरती करने के टाइम  हम लोगो को पत्री का ऑपरेशन हो जायेगा ऐसा बताया गया था', असे सांगण्यात आल्याचा दावा शांतीदेवीच्या नवऱ्याने केला.

कुटुंब नियोजनाचे टार्गेट पूर्ण करण्याच्या नादात महिलेचा बळी?

रुग्णालयातील डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे की, आशा वर्कर यांनी सर्व्हे करून कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन करण्यासाठी या महिलेला रुग्णालयात पाठवले असल्याचे सांगितले. आशा वर्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत शांतादेवी हिचे कुटुंब नियोजन करायचे असल्याचे सांगितले होते. शांतादेवी यांच्या पतीने माझ्या पत्नीला पोटात दुखत असल्याने तिला मूत्रपिंडाचा आजार आहे, असे सांगून तिच्यावर उपचार केले जातील तिचे ऑपरेशन केले जाईल असे सांगितल्याचा आरोप केला आहे. तर डॉक्टरांनी आरोप फेटाळत या रुग्णालयामध्ये महिलांची प्रसूती आणि कुटुंब नियोजनांवर उपचार केले जात असल्याचे सांगितले

शांतीदेवी यांच्या नातेवाईकांनी केलेले आरोप आणि डॉक्टरांनी फेटाळलेले आरोप या दोन्ही मध्ये विसंगती असल्याने नेमकी चूक कोणाची हा प्रश्न आहे.मात्र, शासनाकडे कुटुंब नियोजनाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आशा वर्कर अशिक्षित गरीब कुटुंबांची दिशाभूल करून त्यांना असलेल्या व्याधींवर उपचार केले जात असल्याचे सांगून त्यांची दिशाभूल करून कुटुंब नियोजनाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी शांतीदेवी मौर्या यांच्यासारख्या महिलांना फसवून त्यांचे कुटुंब नियोजन केले जात नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त तथा अतिरिक्त आयुक्त  हर्षल गायकवाड यांच्या पत्नी एमडी पॅथॉलॉजी वैद्यकीय अधिकारी या पदावर अवघ्या  ४८ तासात नियमांना डावलून भरती केल्याचा प्रकार 'एबीपी माझा'ने उघडकीस आला होता डोंबिवलीतील शास्त्री रुग्णालयात प्रसुती दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे महिलांचे मृत्यू थांबण्यासाठी भरती केल्याचे वैद्यकीय अधिकारी दीपा शुक्ल यांनी सांगितले होते. पालिकेचा सावळा गोंधळ उघड झाला असून पालिकेचा आरोग्य सेवा सक्षम करण्याचा दावा फोल ठरला आहे.

आणखी वाचा

पेशंट साडेपाच तास रुग्णालयात, रक्तस्राव सुरुच होता, तनिषा भिसेंचा धीर खचला; रुपाली चाकणकरांनी स्टार्ट टू एंड सगळंच सांगितलं