Ulhasnagar Firing Case : उल्हासनगर गोळीबार प्रकरणी (Ulhasnagar Firing Case) आतापर्यंत तब्बल पाच आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, आरोपी गणपत गायकवाड (MLA Ganpat Gaikwad) यांच्या मुलाचा शोध पोलीस घेत आहेत. आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड (Vaibhav Gaikwad) अजूनही फरार आहे. ठाणे क्राईम ब्रांचकडून वैभव गायकवाडचा शोध सुरूच आहे. 


उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या केबिनमध्ये गोळीबार केला होता. यात कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह राहुल पाटीलही जखमी झाले होते. आतापर्यंत याप्रकरणी पाच आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. अशातच पोलीस आमदार गणपत गायकवाड यांच्या मुलाचा शोध घेत आहेत. 


14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी


उल्हासनगर गोळीबार प्रकरणात पोलिसांकडून सहाजण आणि इतर काही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडली त्या दिवशी आमदार गणपत गायकवाड, संदीप सरवणकर, हर्षल केने यांना अटक केली होती. सर्व आरोपींना उल्हासनगर कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच, सर्व आरोपींना कळवा पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे. 


आमदार गणपत गायकवाड आणि केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांच्या जवळचा आणि नामांकित व्यावसायिक विकी गनत्रा याला अटक केली आणि 12 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या घटनेच्या आठदिवसानंतर आमदार गणपत गायकवाड यांचा वाहन चालक रंजित यादवला ठाणे क्राईम ब्रांचनं अटक केली. आज सर्व आरोपींना उल्हासनगर न्यायालयात हजर केलं गेलं. सर्व आरोपींना न्यायालयानं 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  


गणपत गायकवाड यांचा चालक अटकेत 


भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा ड्रायव्हर रंजित यादवला ठाणे गुन्हे शाखेने अहमदनगर येथून अटक केली आहे. गोळीबार प्रकरणांमध्ये अटकेत असलेले गणपत गायकवाड यांच्यासह आता अटक केलेल्या आरोपींची संख्या पाचवर पोहोचली आहे. आरोपींना न्यायालयाकडून 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावणी आहे. 


काय आहे प्रकरण?


एका 50 गुंठे जमिनीवरून वाद सुरु होता. दरम्यान, त्यानंतर हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहचले. यावेळी गणपत गायकवाड यांचा मुलगा देखील पोलीस ठाण्यात होता. मात्र, पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप करत स्वतः गणपत गायकवाड पोलीस ठाण्यात पोहचले आणि त्यांनी थेट शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. विशेष म्हणजे, "मी स्वत: पोलिसांसमोरच गोळी झाडली. मला याचा पश्चाताप नाही. कारण माझ्या मुलांना जर ते पोलिसांच्या समोर मारत असतील, तर मग मी काय करणार. पोलिसांनी मला पकडलं. त्यामुळेच तो वाचला. मी त्यांना जीवे मारणार नव्हतो. पण पोलिसांच्या समोर जर असं कोणी करत असेल, तर आत्मसंरक्षणासाठी हे करणं गरजेचं असल्याचं गणपत गायकवाड म्हणाले होते.