Thane: उल्हासनगरच्या शासकीय जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयातील धक्कादायक आणि संतापजनक कारभार समोर आला आहे. कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर आणि कल्याण ग्रामीण भागातील हजारो गोरगरीब रुग्णांसाठी आधार असलेल्या या रुग्णालयात एका रुग्णाला तब्बल चार वेळा ऑपरेशनसाठी उपाशी ठेवून शेवटच्या क्षणी शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. राजकुमार पासी नावाचा रुग्ण गेल्या महिनाभरापासून रुग्णालयात दाखल असून, “डॉक्टर नाहीत, कागदपत्रे अपूर्ण आहेत, तपासण्या बाकी आहेत” अशी कारणे देत वारंवार ऑपरेशन पुढे ढकलले जात असल्याचा आरोप आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळत तांत्रिक आणि वैद्यकीय कारणांमुळेच विलंब झाल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. (Ulhasnagar Government Hospital surgery Delay Case)

Continues below advertisement

Ulhasnagar News: नेमकं घडलं काय?

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात राजकुमार पासी हे गेल्या महिनाभरापासून उपचारासाठी दाखल आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगून त्यांना तब्बल चार वेळा दिवसभर उपाशी ठेवण्यात आले. मात्र प्रत्येक वेळी शेवटच्या क्षणी ऑपरेशन पुढे ढकलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.रुग्णाच्या म्हणण्यानुसार, कधी डॉक्टर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले, तर कधी डॉक्टर सुट्टीवर असल्याचे कारण देण्यात आले. सततच्या या विलंबामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांचा मानसिक आणि शारीरिक त्रास वाढला असून, रुग्णालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

रुग्णालय प्रसासानावर टीकेची झोड 

या प्रकरणानंतर रुग्णालय प्रशासनावर टीकेची झोड उठली असताना, जिल्हा शल्य चिकित्सक मनोहर बनसोडे यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. संबंधित रुग्णाचे ऑपरेशन महात्मा गांधी फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत होणार होते. मात्र कागदपत्रांतील त्रुटी, उशिरा झालेली नोंदणी आणि आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण न झाल्याने प्रक्रियेला वेळ लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ऑपरेशनपूर्वी रुग्णाची फिटनेस चाचणी, रक्त तपासण्या आणि इतर वैद्यकीय अहवाल आवश्यक असतात. सर्व अहवाल योग्य आल्यानंतरच शस्त्रक्रिया केली जाते. तसेच आधीपासून दाखल असलेल्या गंभीर रुग्णांच्या शस्त्रक्रियांना प्राधान्य द्यावे लागत असल्याने काही वेळा उशीर होतो, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Continues below advertisement

मात्र, “चार वेळा उपाशी ठेवून शेवटी ऑपरेशन रद्द करणे, हा कोणता वैद्यकीय प्रोटोकॉल?” असा सवाल आता रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे. गरीब आणि गरजू रुग्णांसाठी असलेल्या शासकीय रुग्णालयात अशी अनागोंदी सुरू असेल, तर सामान्य नागरिकांनी उपचारासाठी विश्वास ठेवायचा तरी कुणावर? अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.