Ulhasnagar Doctors Strike: उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात सेवा देणाऱ्या खासगी डॉक्टरांनी कालपासून अचानकपणे आपली सेवा थांबवली आहे. या डॉक्टरांना मागील ८ महिन्यांपासून शासनाने त्यांचं बिलच दिलेलं नसून त्यामुळे खासगी डॉक्टरांनी काम बंद करण्याचा पवित्रा घेतलाय. मात्र यामुळे शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील शस्त्रक्रिया संपूर्णपणे ठप्प झाल्या असून रुग्णांना याचा मोठा त्रास सोसावा लागतोय.
उल्हासनगरच्या कॅम्प ३ मध्ये शासकीय मध्यवर्ती रुग्णालय असून शहरी भागासह कर्जत, कसारा, मुरबाड अशा भागातूनही या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गोरगरीब रुग्ण उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी येत असतात. या रुग्णालयात शासनाने क्लास १ आणि क्लास २ अशी मिळून ३४ डॉक्टर्सची पदं मंजूर केली आहेत. मात्र यापैकी तब्बल 17 पदं रिक्त आहेत. त्यामुळे शासनाकडून शहरातील खासगी तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी घेतली जाते. यासाठी १६ डॉक्टर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या डॉक्टरांना मागील ८ महिन्यांपासून त्यांचं बिलंच देण्यात आलेलं नसून ही रक्कम तब्बल 78 लाख रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे अखेर या खासगी डॉक्टरांनी मध्यवर्ती रुग्णालयाला सेवा देणं मंगळवारपासून बंद केलंय. मात्र यामुळे रुग्णालयात ग्रामीण भागातून उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या गोरगरीब रुग्णांचे मोठे हाल होत असून शस्त्रक्रिया तर संपूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. मध्यवर्ती रुग्णालयात दिवसाला १५ ते २० लहानमोठ्या शस्त्रक्रिया केल्या जातात. ज्यामध्ये प्रसुतीसह हाडांच्या शस्त्रक्रिया आणि अन्य लहान मोठ्या शस्त्रक्रियांचा समावेश असतो. मात्र या शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरच नसल्यामुळे कालपासून संपूर्ण शस्त्रक्रिया ठप्प झाल्या आहेत. परिणामी मध्यवर्ती रुग्णालयात आलेल्या गोरगरीब रुग्णांना ठाणे किंवा मुंबईच्या सरकारी रुग्णालयांमध्ये पाठवलं जात असून याचा रुग्णांना मात्र नाहक मनस्ताप सोसावा लागतोय. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी सिटीझन फोरमचे सत्यजित बर्मन यांनी केली आहे.
खासगी डॉक्टरांच्या या संपाबाबत मध्यवर्ती रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोहर बनसोडे यांना विचारलं असता, खासगी डॉक्टरांनी सेवा देणं बंद केल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच या डॉक्टरांना देण्यात येणारी बिलं शासनस्तरावर प्रलंबित असून त्यामुळे शस्त्रक्रिया आणि उपचार ठप्प झाल्याचं डॉक्टर बनसोडे यांनी मान्य केलं. यावर उपाय म्हणून एक तर शासनाने रुग्णालयाला मंजूर असलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांची भरती करावी, किंवा लवकरात लवकर खासगी डॉक्टरांना त्यांची बिलं द्यावी, असं डॉक्टर बनसोडे म्हणाले. उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात येणारे रुग्ण हे अतिशय गोरगरीब असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेणं शक्य होत नाही. त्यातच प्रसूतीसाठी आलेल्या एखाद्या महिलेला ठाण्या-मुंबईला पाठवताना त्यात मोठा धोका देखील असतो. यातून जर एखाद्या रुग्णाच्या जीवावर बेतलं, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न आता यानंतर उपस्थित झालाय. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर या प्रश्नाकडे लक्ष देऊन हा प्रश्न सोडवण्याची मागणी केली जातेय.