Ulhasnagar Crime : उल्हासनगर (Ulhasnagar) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेंच्युरी रेयॉन कंपनीसमोर असलेल्या मुथूट फायनान्स (Muthoot Finance) या बँकेला लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मुथूट फायनान्सजवळील लॉन्ड्रीच्या (Laundry) दुकानाच्या भिंतीला होल मारुन तिथून बँकेत शिरण्याचा चोरट्यांचा प्लॅन होता. परंतु मात्र बँकेच्या भिंतीला होल मारण्यात त्यांना जास्त वेळ लागल्याने सकाळ झाली. त्यामुळे त्यांनी चोरी करण्यापूर्वीच तिथून पळ काढला. या घटनेतील काही संशयित आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV) झाले आहेत. 


चोरी न करताच चोरट्यांनी पळ काढला


ही घटना रविवारी रात्रीची आहे. उल्हासनगर कॅम्प नं-3, संच्युरी कंपनी परिसरातील मुख्य रस्त्याशेजारी मुथूट फायनान्स बँक आहे. सोन्याच्या दागिन्यांवर याठिकाणी कर्ज मिळते. बँक शेजारीच लॉन्ड्रीचे दुकान आहे. मुथूट फायनान्स या बँकेच्या बाजूला असलेल्या पावर लॉन्ड्रीच्या दुकानातील भिंतीला खड्डा करुन बँक लुटण्याचा प्रयत्न दरोडेखोरांनी केला. मात्र हा प्रयत्न फसला आहे. लॉन्ड्रीच्या दुकानात तर चोरट्यांनी भगदाड पाडलं, पण मुथूट फायनान्स बँकेच्या भिंतीला भगदाड पाडण्यासाठी त्यांना बराच वेळ लागला. खड्डा तयार करता करता सकाळ झाली. त्यामुळे चोरी न करताच चोरट्यांनी तिथून पळ काढला.


दुकानात भगदाड दिसताच लॉन्ड्री मालकाने पोलिसांना कळवलं


सोमवारी सकाळी लॉन्ड्री मालक शांती कानोजिया यांनी दुकान उघडले असता, त्यांना दुकानात भगदाड पडल्याचे दिसून आले. तसेच या दुकानातून मुथूट फायनान्स या बँकेत प्रवेश करुन चोरी करण्याचा आरोपीचा प्रयत्न असल्याचे देखील दिसून आले. या घटनेनंतर कानोजिया यांनी तात्काळ उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन घटनेची माहिती दिली.


चोरांना शोधण्यासाठी पोलिसांचे चार पथक रवाना : पोलीस


पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या घटनेतील संशयित आरोपी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहेत. पोलिसांनी चोरीचा प्रयत्न झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसंच चोरीचा प्रयत्न जरी फसला असला तरी पोलिसांनी आरोपीचा शोध युद्धपातळीवर सुरु केला आहे. चोरांना शोधण्यासाठी चार पथकं रवाना केली असून चोरटे लवकरच जेरबंद होतील, असं पोलिसांनी सांगितलं.


हेही वाचा


Ulhasnagar News : दुचाकी टो होत असल्याचं दिसलं, मालक धाव गेला, पाय अडकून रिक्षावर आदळला, डोकं फुटून जखमी; उल्हासनगरमधील घटना