ठाणे : दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेंभी नाका देवी उत्सवामध्ये (Thane Tembhi Naka Devi Festival) यंदाही दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या उत्सवामध्ये कोणताही वाद होऊ नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केल्याचं दिसून येत आहे.
ठाण्यातील प्रसिद्ध असणाऱ्या टेंभी नाक्यावरील जय अंबे मा नवरात्र उत्सवाची सुरुवात शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी केली होती. आनंद दिघे यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे आणि राजन विचारे एकत्रितरित्या देवीच्या आगमनाला दिसून यायचे. मात्र तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर दोन्ही नेते एकमेकांचे विरोधक बनले.
शिवसेना फुटीनंतर दोन गटात वाद
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 2022 मध्येच देवीच्या आगमनावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन विचारे आणि एकनाथ शिंदे आमने सामने आल्याने दोन्ही बाजूने घोषणाबाजी सुरू झाली. यामुळे वातावरण काही काळाकरता तापलेलं होतं. शेवटी दोन्ही नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना बाजूला केले आणि देवीचे आगमन सुरळीत झाले. तेव्हापासून टेंभी नाक्याच्या देवीच्या आगमनावेळी पोलीस विशेष खबरदारी घेत असतात. नंतरच्या काळात देवीच्या आगमना वेळी राजन विचारे काही वेळाकरताच उपस्थित राहत असून देवीच्या दर्शन घेऊन ते मिरवणुकीतून बाजूला होतात.
आनंद दिघेंवरील वक्तव्यावरून गोंधळ
मागील तीन ते चार दिवसांपासून खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आनंद दिघे यांच्यावरील वक्तव्यावरून ठाण्यात राजकीय वातावरण तापल्याचं दिसतंय. त्याच पार्श्वभूमीवर आज देवीच्या आगमनावेळी पुन्हा ठाकरेंच्या सेनेचे राजन विचारे आणि एकनाथ शिंदे आमने-सामने येण्याची शक्यता आहे. यामुळेच पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे.
रश्मी ठाकरे या दरवर्षी प्रमाणे, 2022 सालीही देवीची ओटी भरण्यासाठी आणि आरती करण्यासाठी राजन विचारे यांच्यासोबत आल्या होत्या. त्यावेळी देखील दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी झाली होती. त्यामुळे टेभी नाका इथे वातावरण तापले होते.
रश्मी ठाकरे आल्यावर किंवा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आल्यावर मंडळातील एसी बंद केला जातो, लाईट घालवले जातात असे आरोप दरवर्षी ठाकरे गटाकडून केले जातात. त्यामुळे यावर्षी देखील वाद होतो का याकडे लक्ष लागले आहे.
ही बातमी वाचा: