मुंबई : एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय ठाण्यात असणार आहे. सचिव संजय मोरे (Sanjay More) यांनी काढलेल्या पत्रकावर आनंद आश्रम असा पत्ता आहे. त्यामुळे यापुढे आनंद आश्रम हे शिंदेंच्या शिवसेनेचं ठाण्यातील मध्यवर्ती कार्यलय असणार असल्याचं स्पष्ट झाले आहे.
मंगळवारी शिवसेना सचिव संजय मोरे यांनी एक पत्रक काढले ज्यात बाळासाहेबांची शिवसेना ऐवजी फक्त शिवसेना म्हणून उल्लेख करावा, असे म्हटले होते. हे पत्र शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून काढण्यात आले होते. मात्र त्यात अधिकृत पत्ता ठाण्याच्या आनंद आश्रमाचा देण्यात आला आहे. आतापर्यंत दादरमधील शिवसेना भवन हेच शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय होते. मात्र आता शिंदे गटाकडे शिवसेना नाव आणि चिन्ह गेल्यानंतर सध्यातरी ठाण्यातील आनंद आश्रम हेच शिवसेना मध्यवर्ती कार्यालय म्हणून कारभार बघणार असे दिसत आहे.
आमदार, खासदार, नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांना आपल्या बाजूनं केल्यानंतर शिंदेच्या समर्थनात गर्दी होत आहे. कार्यकर्त्यांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच शिवसेनेला एका मध्यवर्ती कार्यलयाची आवश्यकता होती. आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शिवसेनेची कार्यलयं होतील. इतकंच नाही तर जेव्हा मुंबईत कार्यकर्ते जमतील म्हणूनच की, काय एकनाथ शिंदेंनी आनंद आश्रम या नव्या कार्यलायची निवड केली.
शिवसेना स्थापनेनंतर दहा वर्षानंतर सेनेला हक्काचं ठिकाण मिळालं. देशातल्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक इथं यायचा आपली भावना मांडायचा आणि त्याला जितका विश्वास बाळासाहेबांवर होता. तितकाच विश्वास शिवसेना भवनाविषयी होता. मुंबईतील दादर येथे असणारं शिवसेना भवन हे कार्यालय उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार आहे. कारण हे कार्यालय शिवाई नावाच्या ट्रस्टच्या नावावर आहे. त्याचे अध्यक्ष लीलाधर ढाके आहेत. तसेच, शिवसेनेचं मुखपत्र असणारं दैनिक सामना, मार्मिक साप्ताहिक या प्रबोधन प्रकाशन या पब्लिक लिमिटेड संस्थेचं असल्यामुळे याचीही मालकीही ठाकरे गटाकडेच असणार आहे.
शिवसेना भवनाचा इतिहास
शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 रोजी झाली. पण सेनाभवन मात्र 1974 साली उभारण्यात आलं. तोपर्यंत मधल्या काही वर्षांच्या काळात शिवसेनेचं कार्यालय पर्ल सेंटरच्या दोन खोल्यांमध्ये होतं. तिथंच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सर्वांना भेटायचे आणि शिवसेनेचं सर्व कामकाज त्याच दोन खोल्यांमधून व्हायचं. सेनाभवन उभारण्यापूर्वी शिवसेनाप्रमुखांचे निवासस्थान हेसुद्धा कार्यालयासारखंच वापरलं जायचं. शिवसेना भवन ही शिवाई ट्रस्टची संपत्ती आहे. तसेच, शिवसेना भवन खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या देखरेखीखाली उभारलं गेलं. महाराष्ट्रातील कोणत्याही प्रादेशिक पक्षाचं इतकं मोठं कार्यालय नाही.