Avinash Jadhav Banned : ठाणे मनसे (MNS) जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांना मुंब्रा (Mumbra) शहरात आणि आसपासच्या परिसरात येण्यापासून ठाणे पोलिसांनी (Thane Police) बंदी घातली आहे. कालच अशाप्रकारचे आदेश काढण्यात आले आहेत. 


अविनाश जाधव यांना 27 मार्च ते 9 एप्रिल दरम्यान मुंब्र्यात येण्यास बंदी


अविनाश जाधव यांच्यावर ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत राजकीय गुन्हे दाखल असल्याचंही आदेशात नमूद करण्यात आलं आहे. या आदेशानुसार जाधव यांना 27 मार्च ते 9 एप्रिल या कालावधीत मुंब्र्यात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशानुसार सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक मालमत्ता आणि जीवितास कोणत्याही प्रकारच्या धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 22 मार्च रोजी झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात विविध ठिकाणी एका विशिष्ट धर्माच्या अवैध बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला होता. यानंतर अविनाश जाधव यांनी ठाण्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडे मुंब्रा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या अवैध मजार आणि मशिदी हटवण्याचं आवाहन केलं होतं. जर कारवाई केली नाही तर या ठिकाणी हनुमानाचे मंदिर बांधू असंही जाधव यांनी म्हटलं होतं.


मुंब्रा धार्मिकदृष्ट्या संवेदनशील : पोलीस


संभाव्य कायदा-सुव्यवस्थेची स्थिती, मुंब्रा हा (धार्मिकदृष्ट्या) संवेदनशील परिसर आणि रमजान महिन्याचा दाखला देत सहाय्यक पोलीस आयुक्त (कळवा डिव्हिजन) विलास शिंदे यांनी अविनाश जाधव यांच्याविरोधात सीआरपीसीच्या कलम 144 अंतर्गत प्रवेशबंदी केली आहे. 


मी 9 तारखेनंतर मुंब्र्यात जाणार आणि हनुमानाचं मंदिर उभारुन दाखवणार : जाधव


पोलिसांच्या या आदेशावर अविनाश जाधव यांनी एबीपी माझाकडे प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही कायदेशीर केलेल्या मागणीला आता धार्मिक रंग चढवला जात आहे. मी नऊ तारखेनंतर नक्की मुंब्र्यात जाईन आणि हनुमानाचे मंदिर उभारुन दाखवेन, असं अविनाश जाधव म्हणाले.


मुंब्रा देवी डोंगरातील अनधिकृत मझार आणि मशिदविरोधात अविनाश जाधव यांनी वन विभाग आणि जिल्हाधिकारी यांना पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिलेला आहे. त्यामुळे धार्मिक वातावरण बिघडत असल्याचे कारण पोलिसांनी दिलं आहे. दरम्यान याच कारणावरुन अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देखील आली होती. मात्र अशा धमक्यांना मी भीक घालत नाही, जर पंधरा दिवसात कारवाई केली नाही तर तिथे नक्की मंदिर दिसेल असे अविनाश जाधव यांनी सांगितलं आहे.