Continues below advertisement

ठाणे : राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर आता प्रशासनही सज्ज झालं आहे. ठाणे पालिकेने (Thane Municipal Corporation) अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये 16.49 लाख मतदारांच्या नावांची यादी (Thane Voters List) आहे. यापूर्वी 20 नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर आता अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अंतिम मतदार यादीत प्रभाग क्रमांक 27 आणि प्रभाग क्रमांक 28 मधील मतदारांची संख्या कमी झाली आहे. तर प्रभाग क्रमांक 29 मध्ये मतदारांमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे. पण यात एकूण मतदारसंख्येत कोणताही बदल झालेला नाही. परिणामी ती संख्या यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीप्रमाणेच 16 लाख 49 हजार 867 इतकी कायम आहे.

Continues below advertisement

ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. 2011 च्या जनगणनेनुसार निवडणूक होत असल्याने गेल्या म्हणजेच 2017 सालाप्रमाणेच यंदाही 33 प्रभागच असणार आहेत. त्यात 32 प्रभाग चार सदस्यांचे तर, एक प्रभाग तीन सदस्यांचा असणार आहे. या प्रभागांची रचनाही पालिकेने अंतिम केली असून या प्रभागांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण आणि महिला राखीव अशी आरक्षण प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेच्या निवडणुका येत्या 15 जानेवारीला होणार आहे. या निवडणुकीकरता निवडणूक विभागाने प्रारूप मतदार यादी 20 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली होती. त्यावर 3 डिसेंबरपर्यंत हरकती व सूचना मागवण्यात आल्या होत्या. प्राप्त हरकती व सूचनांची छाननी करून आयोगाच्या आदेशानुसार सोमवारी, 15 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली.

अंतिम मतदार यादीत दिवा स्टेशन, नागवाडी, साईनाथनगर परिसरातील प्रभाग क्रमांक 27 मध्ये 433, तर मुंब्रा देवी कॉलनीतील प्रभाग क्रमांक 28 मध्ये 3 मतदारांची घट झाली आहे. तर दिवा पूर्व, साबेगाव परिसरातील प्रभाग क्रमांक 29 मध्ये 436 मतदारांची वाढ नोंदविण्यात आली आहे. ठाणे महापालिका हद्दीत 83 हजार 644 दुबार मतदार आढळून आले आहेत.

महापालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वी दुबार मतदारांची यादी जाहीर करत एकप्रकारे कबुलीच दिली होती. मात्र या मतदारांची नावे अद्याप तशीच असून याद्यांमध्ये दुबार नावाच्या पुढे टिकमार्क असणार आहे.

यंदाच्या निवडणुकीत एकूण 16 लाख 49 हजार 867 इतके मतदार आहेत. त्यात 8 लाख 36 हजार 878 पुरुष, 7 लाख 85 हजार 830 महिला मतदार आहेत. तर, 2017 मध्ये एकूण मतदारांची संख्या 12 लाख 28 हजार 606 इतकी होती. त्यात 6 लाख 67 हजार 504 पुरुष, तर 5 लाख 61 हजार 87 महिला मतदारांचा समावेश होता. यंदा मात्र 4 लाख 21 हजार 256 नवीन मतदारांची संख्या वाढली आहे.

ही बातमी वाचा: