Thane: ठाण्यातील घोडबंदर पट्ट्यात मेट्रो मार्गिकेचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. याच मेट्रो मार्गिकेसाठी नळपाडा पाइपलाइन परिसरात पिलरवर गर्डर टाकण्याचं काम होणार असल्याने तीन दिवस वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. या कालावधीत रात्री 11 वाजेपासून पहाटे 6 वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे.विशेष म्हणजे, ठाण्याहून घोडबंदरकडे जाणाऱ्या मार्गावर नळपाडा पाइपलाइन येथे चार पिलरवर लोखंडी गर्डर बसवले जाणार आहेत. हे काम करताना 550 टन क्षमतेच्या दोन मोठ्या क्रेनचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव वळवण्यात आली आहे.
नक्की काय बदल होणार?
शनिवारी 7 जून रात्री 11 वाजेपासून रविवारी 8 जून सकाळी 6 वाजेपर्यंत, तसेच पुढील दोन दिवस म्हणजे 8 व 9 जून रोजीही रात्रीच्या वेळेसच ही वाहतूक बंद राहणार आहे. या बदलामुळे कापूरबावडी सर्कल मार्गे घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कापूरबावडी सर्कल येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने पुलाखालून उजव्या बाजूस वळून नदीबाबा चौक, ढोकाळी मार्गे पुढे जातील. त्याचप्रमाणे, रवी स्टील नाका येथून डावीकडे वळून, पोखरण रस्ता क्र.2 मार्गे गांधी चौक आणि पुढे खेवरा सर्कलमार्गे वाहनांची वाहतूक वळवण्यात येणार आहे. दुसरीकडे, नळपाडा पाइपलाइन परिसरातून तत्त्वज्ञान विद्यापीठ मार्गे घोडबंदरकडे जाणाऱ्या वाहनांना देखील नळपाडा पाइपलाइन येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.नागरिकांनी या दरम्यान पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि पोलिसांनी दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
कुंभार्ली घाटात संरक्षक भिंत कोसळली
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कुंभार्ली घाटात अचानक संरक्षक भिंत कोसळली असून रेलिंगही निखळलीय.घाटात खोल दरीच्या बाजूने असलेली ही भिंत कोसळली. यामुळे त्या ठिकाणी रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. एवढंच नाही तर या भागातील लोखंडी रेलिंगही तुटलं असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. घटनास्थळी प्रशासनाकडून सध्या फक्त दगड लावून तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या उपाययोजना अपुऱ्या असून कोणताही मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पावसाळ्यात अवजड वाहतूक असणाऱ्या घाटपरिसरात आधीच दृश्यमानता कमी झाल्याने अवजड वाहनांसह मोठी वाहतूक कोंडी होते. त्यात आता रस्त्याच्या बाजूने असणाऱ्या संरक्षक भिंतीसह रेलींगही निखळल्यानं अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.
हेही वाचा: