ठाणे : ठाण्याच्या (Thane) कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेमुळे ठाणे शहरात एकच खळबळ माजली आहे. आनंदनगर विहंग व्हॅली चौकात सतीश पाटील या व्यक्तीची गाडी येताच सोबत असेलला भूषण पाटील हा खाली उतरला. त्याच वेळी आरोपींनी बसल्या जागीच सतीश पाटील यांच्यावर सपासप वार करुन हत्या केली. त्यानंतर हत्येचा पोबारा केला. या प्रकरणात फिर्याद करणारा भूषण पाटील हाच आरोपी असल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे.
या हत्येप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दरम्यान या घटनेचे तपास करताना या गुन्ह्यातील फिर्यादीच आरोपी असल्याचं समोर आलं आहे. त्याचप्रमाणे सतीश पाटील याच्या हत्येसाठी दीड कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याचं समोर आलंय. सध्या पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहे. पण ज्या भूषण पाटीलने ही तक्रार पोलिसांत केली त्यानेच ही हत्या घडवून आल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलंय.
नेमकं काय घडलं?
सतीश पाटील वय 55 वर्ष ठाण्यातील वर्तक नगर परिसरात वास्तव्यास होते. ते आणि त्यांचा मित्र भूषण पाटील हे कासारवडवली येथे सोबतच शनिवारी संध्याकाळी सतीशच्या गाडीतून आले. गाडी विहंग व्हॅली चौकात आल्यानंतर गाडी थांबली. त्यावेळी भूषण पाटील हा गाडीतून खाली उतरला. त्याचवेळी दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी सपासप वार करुन सतीश यांची हत्या केली.
या गुन्ह्यात फिर्यादी हा भूषण पाटील होता. मात्र पोलिसांनी त्याची चौकशी केल्यानंतर त्यानेच सुपारी देऊन हत्या केली असल्याची माहिती समोर आलीये. कासारवडवली पोलिसांनी आरोपी भूषण पाटील आणि नितीन पाटील या दोघांना अटक केली. या हत्येत अन्य इसमाचा सहभाग असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी चार पथके बनवून फरार आरोपींचा शोध सुरु केलाय. दरम्यान जे आरोपी फरार आहेत, त्यांच्या अटकेनंतर या हत्येमागचे खरे कारण समोर येईल,अशी माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणात आता पुढे कोणते खुलासे हेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल. कारण नक्की कोणत्या कारणासाठी सतीश यांची हत्या करण्यात आली ते कारण अद्याप समोर आलेलं नाही. त्यामुळे त्या कारणासाठी पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.