भिवंडी : भाजप (BJP) कधीही कोणतीही चुकी मान्य करत नाही, भाजपा (BJP) सध्या सगळच उलट करायला निघाला आहे. जसा राजा, तशी प्रजा अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Dr.Jitendra Awhad) यांनी दिली आहे. रविवारी जितेंद्र आव्हाड (Dr.Jitendra Awhad) शिवसेना शिंदे गटाचे भिवंडी (Bhiwandi Thane) लोकसभा संपर्क प्रमुख सुरेश म्हात्रे यांच्या मुलीच्या विवाहाच्या स्वागत समारंभा करिता भिवंडीत आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आव्हाड यांनी भाजपच्या विकसित भारत यात्रेत व्यासपीठावर लावण्यात आलेल्या तिरंग्याच्या उलट्या प्रतिमेबाबत आपली प्रतिक्रिया दिली. त्याशिवाय भाजपवर त्यांनी टाकास्त्र सोडले.
भाजपची विकसित भारत यात्रा व पंतप्रधान मोदी यांचा संवाद कार्यक्रम शनिवारी भिवंडीतील काल्हेर येथे पार पडला. या कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्यासह अनेक अधिकारी पदाधिकारी व शासकीय यंत्रणेतील कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर लावण्यात आलेल्या बॅनरवर भारताचा राष्ट्रध्वज असलेल्या तिरंग्याची छबी उलटी छापण्यात आली होती तर मोदीच्या संवाद कार्यक्रम सूरू झाल्यानंतर व आधी एलईडी स्क्रीन वरील तिरंग्याची छबी उलट्या स्वरूपात दाखवण्यात आली होती. त्यावरुन जितेंद्र आव्हाडांनी निशाणा साधला. भाजप सर्वच उलटं करायला निघालेय, असे म्हणत आव्हाडांनी यावेळी निशाणा साधला.
हा कार्यक्रम जरी भाजपचा असला तरी या कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय मंत्री तसे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हा अधिकाऱ्यांसह सर्वच शासकीय यंत्रणा कार्यक्रमप्रसंगी उपस्थित असतानाही तिरंग्याच्या उलट्या प्रतिमे बाबत कोणत्याही नेत्याच्या अथवा अधिकाऱ्याच्या लक्षात ही बाब आली नाही हे दुर्दैव आहे असेही आव्हाड यांनी यावेळी सांगितले.
शनिवारी हा कार्यक्रम पार पडल्यानंतर आजसकाळ पासूनच या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरील डिजिटल स्क्रीनची चर्चा समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. त्यानंतर ही अक्षम्य चूक अनेकांच्या लक्षात आली. याबाबत अनेकांनी समाज माध्यमांवर नाराजी व्यक्त करीत यावेळी शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी मंत्री हे व्यासपीठासमोर बसल्यावर स्क्रीनच्या बाजूला असलेली हे डिजिटल बॅनर त्यांच्या लक्षात कसे आले नाही अशी चर्चा नागरिकांनी सुरू केली आहे.