ठाणे: ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात NCC च्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षा म्हणून त्यांच्या सीनिअर्सकडून बेदम मारहाण करण्यात येत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतंय. त्यामुळे मारहाण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आता होत आहे. 


शिक्षक नसताना या विद्यार्थ्यांना सीनिअर्सकडून हो असलेल्या मारहाणीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पावसामध्ये या विद्यार्थ्यांना उलटं झोपायला लावून ही मारहाण केलेली आहे. मारहाण करणारा विद्यार्थी हा सीनिअर एनसीसी कँडिडेट आहे. हा व्हिडीओ पाहताना अंगावर काटा येत असल्याचं पालकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या गंभीर प्रकाराची दखल तातडीने घ्यावी आणि कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 


जोशी बेडेकर कॉलेजच्या प्रांगणात बांदोडकर, बेडेकर आणि पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्त असे NCC चे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणदरम्यान विद्यार्थ्याना आर्मी आणि नेव्हीच्या प्रशिक्षण पूर्वीचे धडे देण्यात येतात. याच दरम्यान विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाल्यास त्यांना शिक्षाही करण्यात येते. मात्र ही शिक्षा अशा अमानवी प्रकारची असल्याचं समोर आल्याने खळबळ माजलीय. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एनसीसीबाबत दहशत पसरली असून अनेकजण एनसीसी नकोच असे म्हणतात  दिसत आहेत. 


या विद्यार्थ्यांनी अजिबात काळजी करू नये, हे असले प्रकार आम्ही कोणीही खपवून घेणार नसल्याच जोशी बेडेकर कॉलेजच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी खडसावून सांगितलं आहे. त्या म्हणाल्या की "एनसीसीचे हेड जे असे असतात ते सिनियर विद्यार्थीच असतात, ते कोणी शिक्षक नसतात. मात्र मारहाणीचा हा अत्यंत घृणास्पद असा प्रकार झाला आहे. यामुळे एनसीसीच्या मार्फत जी चांगली कामं होतात ती झाकोळली गेली आहेत. शिक्षक नसताना झालेला हा प्रकार असून त्या विद्यार्थ्यावर तात्काळ कारवाई करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर हे असले प्रकार यापुढे होऊन नयेत म्हणून एक कमिटीची स्थापनाही आम्ही तत्काळ करत असून ज्या कोणा विद्यार्थ्यांबाबत असे प्रकार घडले असेल त्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये आम्हाला येऊन भेटावे. एनसीसी सोडण्याचा विचार अजिबात करु नये."


ही बातमी वाचा: