Continues below advertisement

ठाणे : महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालं असून त्यासाठीची प्रारुप मतदार यादी (Thane Voters List) प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये शहरात एकूण चार लाख 21 हजार 261 मतदारांची वाढ झाली आहे. शहरातील 33 प्रभागांमध्ये सरासरी 10 हजार मतदारांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे मुंब्रा येथील शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाचे नाव मतदार यादीतून गायब झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे प्रारूप मतदार यादीत घोळ असल्याचं स्पष्ट झालं आहे. ही यादी विधानसभा निवडणुकीच्या यादीला गृहित धरून तयार करण्यात आली आहे. 

महापालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी त्याची तयारी मात्र प्रशासनाने सुरू केली आहे. 2017 सालच्या निवडणुकीप्रमाणे यंदाही 33 प्रभाग असणार आहेत. 32 प्रभाग चार सदस्यांचा तर एक प्रभाग तीन सदस्यांचा असणार आहे.

Continues below advertisement

नव्या मतदारयादीनुसार, ठाण्यात एकूण 16 लाख 49 हजार 867 मतदार असून प्रत्येक प्रभागात सुमारे दहा हजाराहून अधिक मतदार वाढल्याचं चित्र आहे. एकीकडे मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्याचवेळी आता चार लाख मतदार वाढल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे प्रारूप मतदार याद्या बारकाईने तपासण्याचं मोठं आव्हान विरोधी पक्षांसमोर आहे.

Mumbra Election : ठाकरेंच्या नगरसेवकाचं नाव गायब

आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी नुकतीच प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. ठाण्यात चार लाख मतदार वाढले आहेत. मात्र असे असताना यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे समोर आले आहे. मुंब्र्यातील प्रभाग क्रमांक 31 चे शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल तीन टर्म असलेले माजी नगरसेवक सुधीर भगत यांचेच नाव मतदार यादीमधून वगळण्यात आले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या मतदारयादीतील गोंधळ समोर आला आहे.

BMC Election : मुंबईमध्ये मतदार वाढले

मुंबई आणि ठाण्यासह आसपासच्या महानगरांमधल्या मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं मतदारांची वाढलेली संख्या आगामी महापालिका निवडणुकीत नेमकी कोणत्या पक्षाच्या पथ्यावर पडणार हा प्रश्न आहे.

मुंबई आणि ठाण्यासह विविध महापालिकांच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदारयाद्या गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यानुसार 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीच्या तुलनेत मुंबईत यंदा 11 लाख 80 हजार 191 मतदारांची वाढ झाली आहे. ठाण्यात मतदारांची संख्या चार लाख 21 हजार 261 इतकी वाढली आहे.

कल्याण डोंबिवलीतही मतदारांच्या संख्येत एक लाख 73 हजार 674एवढी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या वाढीत महिला मतदारांची संख्या अधिक आहे. जुलै 2025 मधली मतदारयादी ही 2025 सालच्या विधानसभा निवडणुकीच्या यादीला गृहित धरून तयार करण्यात आली आहे.