Dahi handi 2022 : दहीहंडी उत्सवात ज्याप्रकारे गोविंदा पथकांनी लावलेले मानवी मनोरे बघण्यासाठी लाखोंची गर्दी उसळते, त्याचप्रमाणे या दहीहंडी उत्सवात कोणत्या आयोजकाकडे कोणते सेलिब्रिटीज बघायला मिळतील हे बघण्यासाठी देखील तितकीच गर्दी असते. त्यासाठी आधीपासूनच प्रमोशन देखीलल सुरू करण्यात येते. ठाण्यात यावर्षीच्या दहीहंडीमध्ये कोणत्या आयोजकांनी कोणते सेलिब्रिटी बोलवले आहेत, ते पाहूयात...
ज्या सिनेतारकांना टीव्हीवर किंवा मोबाईलवर पाहिलेले असते, त्यांना प्रत्यक्षात बघण्याची नामी संधी दहीहंडी उत्सवात चालून येते. आणि अशी संधी सहसा कोणी सोडत नाही. गेली दोन वर्ष कोरोनामुळे दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर निर्बंध असल्याने गोविंदांना आणि सर्वसामान्य नागरिकांना देखील अशी संधी उपलब्ध झाल्या नव्हती. यावर्षी मात्र निर्बंध मुक्त असा दहीकाला उत्सव साजरा करण्यात येतोय. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यातील आयोजक देखील प्रचंड उत्साहात हा उत्सव साजरा करणार आहेत. त्यासाठी प्रसिद्ध असे सेलिब्रिटीज आपल्याच स्टेजवर असावे यासाठी देखील अनेकांची धडपड सुरू आहे. ठाणे शहरात मोठ्या आयोजकांपैकी एक असलेल्या प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या मंचावर दाक्षिणात्य स्टार डियर कोम्रेड फेम विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडे येणार असल्याचे कळते आहे. यासोबतच अनेक ठिकाणी बॉईज 3 ची पूर्ण टीम, अवधूत गुप्ते दगडी चाळ 2 ची टीम, अंकुश चौधरी पूजा सावंत, अमेरिका गॉट टॅलेंट मधून प्रसिद्ध X1X ग्रुप परफॉर्मन्स, असे सेलिब्रिटी बघायला मिळतील.
धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभी नाका येथील दहीहंडी उत्सवाला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत. या तिन्ही नाक्यावर उद्या... यामी गौतम, तमन्ना भाटिया, श्रद्धा कपूर आणि जॅकी श्रॉफ या बॉलीवूड कलाकारांच्या सोबत भार्गवी चिरमुले, अवधूत गुप्ते, हार्दिक जोशी, स्मिता सरोदे, सुप्रिया पाठारे, शर्मिष्ठा राऊत, पूर्णिमा तळवलकर, चेतन वर्दने, बॉईज 3 ची टीम, पार्थ भालेराव, सुमंत शिंदे, विदुला चौघुले असे मराठी कलाकार बघायला मिळतील.
दुसरीकडे स्वामी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला हार्दिक जोशी, अक्षाया देवधर, बॉईज 3 ची टीम, अनु मलिक, शशांक कल्याणकर आणि चला हवा येऊ द्या टीम, हास्य जत्रा टीम आणि शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर देखील उपस्थित असतील.