Thane Bhiwandi Rain : दोन दिवसांपासून भिवंडी आणि परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे जनजिवन विस्कळीत झालेय. ग्रामीण भागात घरामध्ये पाणी साचलेय. कामवारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीकाठी असलेल्या वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. इदगाह रोड परिसरात शेकडो घरात पाणी शिरले आहे.
खाडीपार परिसरात घरांमध्ये तीन ते चार फुटांपर्यंत पाणी
भिवंडीत कामवारी नदीला पूर आल्याने शहरालगतच ग्रामीण भागात देखील पुराचा फटका बसला आहे. खाडी पार परिसरात अनेक घरांमध्ये तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचल्याने नागरिक घरामध्ये अडकून बसले आहेत. तर आपला जीव धोक्यात टाकून अनेक तरुण नदीच्या प्रवाहात पोहत आहेत मात्र प्रशासनाचा याकडे अक्षरशः दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी पुरात वाहून गेल्याने मृत्यूचा घटना घडत असताना प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे. खाडीपार परिसरात अनेक घरांमध्ये व कारखान्यांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात घरांचे व कारखान्याचे नुकसान झाले आहे. तर स्थानिकांच्या मदतीने नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत. मात्र प्रशासनाने त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करावी अशी मागणी स्थानिकांच्या वतीने केले जात आहे.
येवई गावात गोदाम बांधकामामुळे नैसर्गिक नाला अरुंद झाला, घरात पाणीच पाणी
भिवंडी ग्रामीण भागामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस होत असल्याने अनेक सकल भागात पाणी साचले आहे. मात्र डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने ओढ्याचे पाणी नाल्यात येत असते. येवई गावच्या हद्दीत आर के गोदाम संकुल उभारण्यात आले असून नैसर्गिक नाल्याशी छेडछाड करून त्यामध्ये भरणी व नाला अरुंद केल्याने नाल्याचे पाणी बाहेर फेकल्याने गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचा आरोप येथील गावकऱ्यांनी केला आहे. तसेच यासंदर्भात प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. गावात घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने घरांचे व शेताचे नुकसान झाले आहे. तर घटनास्थळी पंचनामे झाले असून पुढील कारवाई सुरू आहे . तर गावकऱ्यांनी हे नैसर्गिक नाले जसे होते तसेच ठेवावे अशी मागणी केली आहे.
कामवारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली
भिवंडीत शनिवारपासून मुसळधार पाऊस होत असल्यानं कामावारील नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीकाठच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. तर महापालिकेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र अनेक घर व दुकान पाण्याखाली गेल्याने अनेक जण प्रशासनाच्या मदतीची वाट बघत आहे.
भिवंडीत मुसळधार पावसामुळे शेकडो घरात शिरले पाणी
भिवंडी शहरात काल पासून होत असलेल्या पावसामुळे कामवारी नदीची पातळी वाढल्याने नदीकाठी असलेल्या वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. इदगाह रोड परिसरात शेकडो घरात पाणी शिरले आहे. बाजापेठ, तीन बत्ती, भाजी मार्केटमध्ये शेकडो दुकानात देखील पाणी शिरले आहे. बाजापेठ, तीन बत्ती, भाजी मार्केट, कल्याण नाका, कमला हॉटेल, तांडेल मोहल्ला, ईदगाह रोड, म्हाडा कॉलनी,नदी नाका परिसरात पाणीच पाणी झाले आहे. परिसरातील शेकडो वाहन देखील पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर नदीकाठच्या परिसरात दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साचले होते.