Thane News : मुंबई - नाशिक महामार्गावर धक्कादायक घटना घडली आहे. पार्किंग केलेल्या एका ट्रकमध्ये चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुंबई -नाशिक महामार्गावर मोतीमहल हॉटेलजवळ ही घटना घडली आहे.
ट्रक चालकाचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई - नाशिक महामार्गावर मोतीमहल हॉटेलजवळ एका ट्रक चालकाने आपली ट्रक पार्क केली होती. मात्र भरपूर वेळ ट्रॅक एकच ठिकाणी का थांबून ठेवला आहे हे येथील लोकांच्या लक्षात आले. त्यानंतर जाऊन बघितले तर ट्रक चालकाचा आतमध्ये मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेनंतर लगेच त्यांनी पोलिसांना फोन केला. घटनास्थळी पोलिस कर्मचारी सचिन परदेशी यांनी येऊन अन्य साथीदारांच्या मदतीने ट्रक चालकाला बाहेर काढले व शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एका नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू
नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एका नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक गटना घडली आहे. निलेश कोतकर या 40 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. अंबड एमआयडीसीतील एक्सलो पॉईंट परिसरात चिखल आणि खड्ड्यांमुळे दुचाकीचा अपघात. जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नाशिक शहरातील खड्ड्यांनी आमच्या कुटुंबावर हा प्रसंग ओढवला आहे. शासन प्रशासनाने नियोजन का केले नाही? शहरातील खड्ड्यांमुळे आमच्या कुटुंबात खड्डा पडला आहे हा खड्डा कसा भरून काढणार असा सवाल निलेश कोतकर यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. निलेश यांच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कारण घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर पाच वर्षाच्या मुलीचा त्याच्या पक्षात असणाऱ्या पत्नीचा उदरनिर्वाह कसा चालणार? असा सवाल केला आहे.