ठाणे : ठाण्यातील लोक आता सिनेमा काढतायत, आपणही 'नमक हराम 2' (Namak Haraam) चित्रपट काढणार आणि ठाण्यातील सगळ्या हरामखोरांवर प्रकाश टाकणार अशी सणसणीत टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी केली. आतापर्यंत ज्या सापाला दूध पाजलं त्या सापाने आता फणा काढलाय, पण त्याला ठेचल्याशिवाय राहणार नाही असंही ते म्हणाले. ठाण्यातील रंगायतनमध्ये ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. त्यामध्ये बोलताना संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीका केली. 


ठाण्यातील कार्यक्रमात जात असताना उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांनी शेण आणि बांगड्या फेकल्या. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी रंगायतनमध्येही घुसून गोंधळ घातला. त्यानंतर झालेल्या मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका केली. 


फणा काढलेल्या सापाला ठेचणार


एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, ज्या सापाला आतापर्यंत दूध पाजलं तो वळवळतोय, त्यांचा फणा ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही. सध्या ठाण्यातील लोक आता फार सिनेमे काढतात. मलाही एक सिनेमा काढायचा आहे 'नमक हराम 2'. मी याआधी बाळासाहेबांवर सिनेमा काढला आहे. मी एक चांगला लेखक आणि पत्रकार आहे. 'नमक हराम 2' चित्रपटाची स्क्रिप्ट तयार आहे. त्यामाध्यमातून ठाण्यातील सगळ्या हरामखोरांवर प्रकाश टाकणार आहे. 


गद्दारांनी ठाण्याचं नाव मातीत घातलं


संजय राऊत म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांच्या नंतर हे ठाणे आनंद दिघेंच्या नावाने ओळखलं जायचं, आता या गद्दारांनी ठाण्याचं नाव मातीत घातलं. ज्या ठाण्याची प्रतिष्ठा होती, त्या ठाण्याचं नाव बदनाम केलं. पैसे आहेत म्हणून एकदा लोकसभेला जिंकलात. मिंधेंच्या रक्तात लबाडी आहे, त्याशिवाय जिंकूच शकणार नाहीत. ठाण्यात ते लबाडी करून जिंकले. लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. मग ठाण्यामध्ये किती बहिणींचे संसार यांनी उद्ध्वस्त केले ते सांगावं. लहान लहान व्यवसायांवर बुलडोझर फिरवले. लाडक्या बहिणीची किंमत फक्त दीड हजार आणि आमदारांना 50 कोटी, मतदारांना 10 हजार दिले. ठाकरेंसोबत राहणाऱ्या लाडक्या बहिणींना उद्ध्वस्त केलं. हा गुजरात पॅटर्न, महाराष्ट्रात चालणार नाही. 


उद्धव ठाकरे दिल्लीत का गेले होते असा प्रश्न मिंधे विचारतात, पण गद्दारांना गाडायला आम्ही दिल्लीत गेलो होतो आणि त्यांना गाडणारच असं संजय राऊत म्हणाले. ते म्हणाले की, लायकी नसताना तुमच्या पोराबाळांना दिल्लीत पाठवायचं काम उद्धव ठाकरेंनी केलंय. दिल्ली ही आता गुजरातची राजधानी झालीय. ती पुन्हा देशाची राजधानी करायची. त्यासाठी आम्ही दिल्लीला गेलो होतो. 


ही बातमी वाचा: