ठाणे : राज ठाकरेंचा ताफा अडवून त्यांच्यावर सुपारी टाकल्याच्या घटनेला आता मनसैनिकांनी जशास तसं उत्तर दिलं असून उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर आता मनसेच्या सैनिकांनी शेण टाकलं आहे. त्यानंतर मनसैनिक आक्रमक होत थेट उद्धव ठाकरेंचा कार्यक्रम सुरू असलेल्या ठाण्यातील रंगायतनमध्ये घुसले. त्यामुळे या ठिकाणी आता मोठा गोंधळ झाला आहे. 


मनसेचे 50 ते 60 कार्यकर्ते या ठिकाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला. त्यामध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. मनसेचे कार्यकर्ते ठाण्यातील रंगायतनमध्ये घुसले आणि त्यांनी शिवसेनेचा बॅनरही फाडला. या प्रकारानंतर शिवसैनिकही त्याठिकाणी जमा झाले आणि गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. 


शिवसेना ठाकरे गटाचा आज ठाण्यातील रंगायतनमध्ये मेळावा आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे हे येत असताना त्यांच्या गाडीवर शेण आणि बांगड्या फेकण्यात आल्या. नंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेत थेट रंगायतनमध्ये घुसले. त्यानंतर गोंधळ घालायला सुरूवात केली.


राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना त्याचा ताफा अडवून शिवसैनिकांनी त्यांच्यासमोर सुपाऱ्या फेकल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिलं. मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य करत त्यांच्या गाडीवर शेण आणि बांगड्या फेकल्या. 


जशास तसं उत्तर देणार


राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर सुपारी फेकल्याने आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे पाऊल उचलल्याचं मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले. यापुढे जशास तसं उत्तर दिलं जाईल असंही ते म्हणाले.


मनसेच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या राड्यावर आता शिवसैनिक कशा प्रकारे प्रत्युत्तर देतात हे पाहावं लागेल.