Ramdas Athawale On Sambhaji Bhide :  महात्मा गांधी ( Mahatma Gandhi ) यांनी ब्रिटिशांना आव्हान देत स्वातंत्र्यासाठी लढा दिला. महात्मा गांधी यांच्यावरील वक्तव्य हे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या वयाला शोभणारे नसल्याची प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी दिली. यावेळी त्यांनी संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर त्यांच्यावर कारवाईची मागणी सुरू आहे. याआधीदेखील त्यांनी महात्मा फुले, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. 


उल्हासनगर कॅम्प चारमधील कुर्ला कॅम्प परिसरात एका सभागृहामध्ये एका खाजगी कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री रामदास अठावले आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना संभाजी भिडे यांच्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली.  त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देताना म्हटले की, संभाजी भिडे यांच्या वयाला हे विधान शोभत नाही. ते अनेक वेळेला आपल्या पद्धतीने भूमिका मांडतात. त्यामुळे जनतेच्या भावना दुखवतात. महात्मा गांधी हे स्वातंत्र्य सेनानी होते. इंग्रजांच्या काळात त्यांनी चांगल्या प्रकारे लढा दिला होता. गांधीच्या विरोधात असं वक्तव्य करणं त्यांच्या वयाला शोभत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंवर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कारवाई करावी अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.


संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यात विविध पक्ष, संघटनांनी संताप व्यक्त केला. काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीकडून भिंडेंच्या वक्तव्यावरून निदर्शने करण्यात आली. 


वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरुच 


संभाजी भिंडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याची मालिका काही थांबता थांबत नाही. आधी 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्यदिन नाही, त्यानंतर आता महात्मा गांधी यांचे वडील मुस्लीम होते असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांच्याकडून करण्यात आली आहे. यावरुन वाद सुरु असतानाच शनिवारी पुन्हा एक वक्तव्य भिडे यांनी केले आहे. अखंड हिंदुस्थानासाठी पंडित जवाहरलाल नेहरु यांचे नखाएवढेही योगदान नसल्याचे वक्तव्य भिडे यांनी केले आहे. त्यामुळे देशभरात त्यांच्या वक्तव्याचा निषेध केले जात असून, संतापही व्यक्त केला जात आहे. 


महात्मा गांधींचा अपमान सहन करणार नाही; उपमुख्यमंत्री फडणवीस 


'कोणत्याही परिस्थितीमध्ये महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा अपमान सहन केला जाणार नाही', असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.  'महात्मा गांधी देशाचे राष्ट्रपिता आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे महानायक आहेत, त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणं चुकीचं आहे.' तसेच भिडे गुरुजी आणि इतर कोणीही अशाप्रकारचे वक्तव्य करु नये असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे जनतेमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याचं देखील यावेळी फडणवीसांनी म्हटलं आहे.