मुंबई : ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिंदे गटात (Eknath Shinde Group) राजकीय वातावरण तापलेलं आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक नजीब मुल्ला (Najbi Mulla)यांच्या वाढदिवसाला मुंब्र्यात लागलेल्या बॅनरमुळे चांगलीच राजकीय चर्चा रंगलीय. नजीब मुल्ला हे आमदार जितेंद्र आव्हाड आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे निकटवर्ती मानले जातात. याच नजीब मुला यांच्या बॅनरवर शुभेच्छा देताना एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाच्या नेत्यांचे फोटो लागल्याने नजीब मुल्ला शिंदे गटाच्या वाटेवर आहेत का ? जितेंद्र आव्हाड यांना शह देण्यासाठी नजीब मुल्ला यांना मोठं केलं जातंय का? असे प्रश्न ठाण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहेत.  


शिंदे गटाचे प्रवक्ते आणि ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी एका कवितेतून एक प्रकारे नजीब मुल्ला यांना शिंदे गटात येण्याचे निमंत्रण दिलंय. एवढ्यावरच म्हस्के थांबले नाहीत तर नजीब मुल्ला हे आमदारकीचे परफेक्ट मटेरियल असून ते लवकरच आमदार व्हावे अशी इच्छा असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून आता राजकीय तर्क वितर्क लढवले जात आहेत. 
 
नजीब मुल्ला हे अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांचे विश्वासू मानले जातात. ठाणे महापालिकेत त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिलंय. कळवा मुंब्रा परिसरात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समुदाय त्यांना मानतो. राष्ट्रवादी पक्षाची ताकद ठाण्यात वाढविण्यामध्ये एक तरुण चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.


एकीकडे ठाणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ठाणे शहरात मुख्यमंत्र्यांना आणि शिंदे गटाला जितेंद्र आव्हाड आणि समर्थकांकडून वेळोवेळी विरोध केला जात आहे. हे सुरू असतानाच आता जितेंद्र आव्हाड यांना शह देण्यासाठी ही एक वेगळी रणनीती खेळली जातेय का? असा प्रश्न उपस्थित होतोय. मुंब्रा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांना मानणारा मोठा वर्ग आहे. याच बालेकिल्ल्यामध्ये शिंदे गटाकडून त्यांचेच विश्वासू नजीक मुल्ला यांना प्रोत्साहन दिले जात असल्याचं या पोस्टर्स आणि कार्यक्रमातून दिसून येतंय. दरम्यान, यावर स्वत: मुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


"माझे पोस्टर्स कोणी लावायचे? कसे लावायचे? यावर मी नियंत्रण ठेवू शकत नाही. मात्र, त्यावर अशा प्रकारची चर्चा होणं चुकीचं आहे. पोस्टरवर फोटो लावले म्हणून त्या पक्षात गेलो असा अर्थ होत नाही, असे मुल्ला यांनी म्हटलं आहे.  


या पोस्टर्सबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटले आहे की, "नजीब मुल्ला हे राष्ट्रवादीचे खंदे आणि विश्वासू नगरसेवक असून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहतील. शिवाय शिंदे गटाला आणि मुख्यमंत्र्यांना विरोध केला जात असल्याने अशा प्रकारे वातावरण निर्मिती केली जात असल्याचं राष्ट्रवादी नेत्यांकडून सांगण्यात आलंय.  


महत्वाच्या बातम्या


Pune Bypoll Election : कसबा अन् चिंचवडच्या पोटनिवडणुकीबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले....