Mumbai rain Update News : मागील दोन दिवसांपासून अंबरनाथ शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरलं आहे. त्यामुळं प्राचीन शिवमंदिरातील शिवलिंग पाण्यात बुडालं आहे.
अंबरनाथमध्ये तब्बल 962 वर्ष जुनं प्राचीन शिवमंदिर आहे. या मंदिराला लागूनच वालधुनी नदी वाहते. प्राचीन शिवमंदिरातून पिंडीवरील पाणी बाहेर जाण्यासाठी एक आऊटलेट थेट वालधुनी नदीत सोडण्यात आलंय. गेल्या 2 दिवसांपासून अंबरनाथ शहरात मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे वालधुनी नदीला मोठा प्रवाह आला आहे. नदीचं हेच पाणी या आऊटलेटमधून थेट गाभाऱ्यात शिरलं. ज्यामुळे शिवलिंग देखील पाण्यात बुडाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी शिवलिंगावरील मुखवटा, नाग हे काढून ठेवण्यात आलं आहे. बदलापूरमध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. लोकलचाही खोळंबा झालाय. मुसळधार पावसामुळे बदलापूरमधील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
बदलापूरमध्ये पूरस्थिती -
बदलापूरमध्ये पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास बदलापूरमध्ये पूर येण्याची शक्यता आहे. उल्हास नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. सकाळी 9 वाजता पाणी पातळी 16.50 मीटर इतकी होती. धोक्याची पातळी 17.5 मीटर इतकी आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज असल्याच्या सूचना प्रशासनामार्फत दिल्या आहेत. हेंद्रपाडा, मांजर्ली, वालीवली सोनिवली परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पूर परिस्थितीसाठी प्रशासन सज्ज आहे.
बदलापुरात मांजरली परिसरातील 3 रहिवासी इमारतींचा मुख्य रस्ता बंद
दोन दिवस पडणाऱ्या सततच्या पावसामुळे बदलापूर पश्चिम दिपाली पार्क मांजर्ली परिसरात गुडघाभर पाणी साचले आहे. या परिसरातील तीन ते चार इमारतीमधील रहिवासी या इमारतीत अडकले आहेत. या ठिकाणी एकच रस्ता वाहतुकीसाठी असल्याने याच रस्त्यावर दोन दिवसांपासून पाणी साचून आहे. दरवर्षी या परिसरात हीच परिस्थिती कायम असते, आणि याकडे स्थानिक प्रशासनाचे लक्ष नसल्याने, येथील नागरिक आता प्रशासनावर नाराजी व्यक्त करत आहेत.
बदलापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे ट्रकवर साचलं पाणी, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प
मुसळधार पावसामुळे मध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मागील तासभरापासून मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे, त्यामुळे बदलापूर स्थानकात मुंबई आणि कर्जत च्या दिशेने प्रवास करणारे प्रवाशी बदलापूर स्थानकावर अडकले आहेत. तर काही प्रवासी लोकलची प्रतीक्षा करत थांबले आहेत.
लोकल बंद पडल्यामुळे महिला रुग्णाला फटका
बदलापुरात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा दणका मध्य रेल्वेला बसला असून, बदलापूर रेल्वे स्थानकातून एकही रेल्वे मुंबईच्या दिशेने रवाना होणार नाही अशी सूचना प्राप्त झाल्या. त्यानंतर, फलाट क्रमांक एकवर मुंबई साठी जाणाऱ्या लोकलमध्ये, उपचारासाठी सायन रुग्णालयात जाणाऱ्या महिलेला याचा फटका बसला आहे. रुग्णालयात दाखल होण्यासाठी निघालेल्या या महिलेला आता पुन्हा घरी माघारी फिरावं लागत आहे.