Sandeep Deshpande MNS :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande Attack) यांना मुंबई येथे मारहाण झाल्याप्रकरणी मनसेने आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे. या हल्लाप्रकरणी ठाण्यातील चिराग नगर येथून दोन जणांना मुंबई पोलिसानी (Mumbai Police) चौकशीकरिता ताब्यात घेतले आहे. ही माहिती कळताच ठाण्यातील शेकडो मनसेचे सैनिक (MNS Activist) आक्रमक झाले. यावेळी मनसैनिकांनी संशयित आरोपींच्या घरी धडक दिली. त्यामुळे परिसरात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. 


मुंबई पोलिसांनी हल्ला प्रकरणात ठाण्यातील लक्ष्मी नगरमधील संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समजताच ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते संशयिताच्या घरीच धडकले. त्यांनी थेट ताब्यात घेतलेल्या संशयितांच्या घरावर एकप्रकारे हल्लाच चढवला. एका आरोपीच्या घरी कोणीही आढळून आले नाही. तर दुसऱ्या संशयित आरोपीच्या महिला नातेवाईकासोबत मनसैनिकांनी वाद घातला. मनसैनिक कमालीचे आक्रमक झाले होते. या हल्ल्याचा जो कोणी म्होरक्या आहे त्याला थेट इशारा देण्यासाठी आम्ही आलो असून आम्ही शांत बसणारे नाहीत असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महिलेला सांगितले. त्यावर महिलेने घरात आता महिला असताना तुम्ही घरावर कसे आलेत, असा प्रश्न महिलेने केला. मी कोणालाही वाईट शब्द बोलले नाही, असेही या महिलेने सांगितले. यावर अविनाश जाधव यांनी आपण महिलेसोबत बोलत नाही, असे म्हटले. या वादाचा व्हिडीओ समोर आला आहे. 


ठाण्यातून तीन जण ताब्यात 


संदीप देशपांडे यांना मुंबई येथे मारहाण झाल्याप्रकरणात आता आणखी काही सीसीटीव्ही फूटेज आणि काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत. मुंबई पोलिसांनी आज शिवसेना ठाकरे गटाशी संबंधित असलेल्या दोघांना अटक केली. त्यानंतर आता, या मारहाण प्रकरणातून ठाण्यातील चिराग नगर येथून तिघांना चौकशीकरिता ताब्यात घेतले आहे. 


भांडुपमधून दोन जण अटकेत


मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्लाप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केले आहे.  घटना घडल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवली होती. तपासासाठी विशेष पथकाची देखील नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर अखेर आज (4 मार्च) दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दोन जणांपैकी अशोक खरात हे शिवसेना महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार सेनेचे उपाध्यक्ष आहेत. ते भांडुपच्या कोकण नगर विभागाचे रहिवासी आहेत.  आज सकाळी साडेसहा वाजता गुन्हे शाखेने खरात यांना ताब्यात घेतले आहे. 


इतर महत्त्वाची बातमी: