ठाणे : मीरा रोडमधील एका सोसायटीमधील गरबा कार्यक्रमाच्या वेळी (Garba Event In Mira Road Society) अंडी फेकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. रहिवाशांच्या तक्रारीनंतर मोहसिन खान नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हाही नोंदवण्यात आला. मात्र हे असे कृत्य आपण केलं नाही, आपल्या घराला जाळी असल्याने अंडी कशी काय फेकू शकतो असा प्रश्न मोहसिन खानने केला. पोलिसांनी या प्रकरणी सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासावे, त्यात जर दोषी सापडलो तर फाशी द्या असंही मोहसिन खान म्हणाला.
या आधी सोसायटीमधील अनेकांची मदत केली आहे, त्यामुळे असे नीच कृत्य करणार नाही. फक्त मोहसिन नाव असल्याने यांना सोपं टार्गेट मिळालं असं मोहसिन खान म्हणाला. एबीपी माझाशी बोलताना त्याने नेमकं काय घडलं याची माहिती दिली.
Mira Road Society Garba Event CCTV : पोलिसांनी सीसीटीव्ही तपासावेत
मोहसिन खान म्हणाला की, "माझा कोणत्याही सणावाराला किंवा कार्यक्रमाला विरोध नाही. पण या सोसायटीमध्ये लहान मुले राहतात, त्यांच्या परीक्षा सुरू आहेत. काही वृद्ध राहतात, त्यांच्या आरोग्याची काळजी आहे. त्यामुळे गरब्याच्या कार्यक्रमात मर्यादेपेक्षा जास्त आवाजाला विरोध केला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी डेसिबल तपासला. तो डेसिबल मर्यादेपेक्षा जास्त होता. त्यामुळे आवाज करण्याची विनंती मी केली. त्यानंतर मी माझ्या घरी गेलो, पण तीन लोक माझा पाठलाग करत होते. याचे सगळे सीसीटीव्ही फुटेज तुम्ही पाहू शकता, पोलीसही ते पाहू शकतात."
Mira Road Garba News : माझ्या खिडक्यांना जाळी लावली
आपल्या घरांच्या खिडक्यांना जाळी लावली आहे, मग त्यातून अंडी कशी काय फेकू शकतो असा प्रश्न मोसिन खानने केला. तो म्हणाला की, "मला जर विरोध करायचा असेल तर समोरून येऊन करेन. असे अंडी फेकण्याचे फालतू कृत्य मी करणार नाही. डास येऊ नयेत म्हणून माझ्या घराच्या खिडक्यांना जाळी लावण्यात आली आहे. त्यातून बारीक दगडही आत किंवा बाहेर जाऊ शकत नाही. मग अंडी कशी काय फेकू शकतो?
Mira Road Navratri Event : अंडी फेकली असतील तर फाशी द्या
मोसिन खान म्हणाला की, "आताचा विवाद हा राजकीय आहे. काही लोकांना त्यांची व्होट बँक निर्माण करायची आहे म्हणून माझ्यावर असा आरोप केला जात आहे. मोसिन हे सोपं टार्गेट आहे. यांच्याच लोकांनी अंडी फेकली असतील आणि माझ्यावर नाव टाकले. पोलिसांनी सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासावे, खरा प्रकार उघडकीस येईल. मी जर अंडी फेकली असतील तर मला फाशी द्या."
Eggs Thrown At Garba Event : नेमकं काय घडलं?
मीरा रोड पूर्वेतील जेपी नॉर्थ गार्डनर सिटी या नामांकित सोसायटीतील सार्वजनिक गरबा कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ उडाला होता. गरबा खेळ सुरू असताना त्यावर अंडी फेकल्याच्या आरोप करण्यात आला. त्यानंतर एस्टेला बिल्डिंगचा रहिवासी मोहसीन खान याच्याविरोधात काशिमिरा पोलिसांनी बीएनएस कलम 300 अंतर्गत गुन्हा दाखल केला.
30 सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता सोसायटीत गरबा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी या कार्यक्रमातील आवाजाची पातळी ही मर्यादेपेक्षा जास्त असल्याचं सांगत मोहसिन खानने तक्रार केली. त्यानंतर रात्री 10.50 वाजता या कार्यक्रमाच्या ठिकाणी अंडी फेकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.
या प्रकारामुळे सोसायटीतील रहिवाशांमध्ये प्रचंड संताप पसरला. यामागे मोहसीन खानचाच हात असल्याचा संशय रहिवाशांनी व्यक्त केला. या प्रकरणाची तक्रार शिवसेना शाखाप्रमुख महेश शिंदे तसेच विविध हिंदुवादी संघटनांनी पोलीस ठाण्यात दाखल केली. वाढत्या दबावाखाली अखेर पोलिसांनी धार्मिक उपासना आणि गरबा कार्यक्रमात विघ्न आणल्याच्या आरोपाखाली मोहसिन खानविरुद्ध गुन्हा दाखल केला.
सद्यस्थितीत मोहसीन खानला अटक करण्यात आलेली नाही. मात्र त्याला चौकशीसाठी ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वीही बकरी ईदच्या दिवशी या सोसायटीच्या रहिवाशांचा आणि मोहसिन खानचा वाद झाल्याची माहिती आहे.
ही बातमी वाचा :