ठाणे : विविध सुशोभीकरण करून मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात लोकार्पण केलेल्या ठाण्यातील मासुंदा तलावाचे पुन्हा एकदा सुशोभीकरण करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या स्मार्टसिटी योजनेतून गेल्या चार वर्षांत 11 कोटी खर्चून सुशोभिकरण केल्यानंतर पुन्हा याच तलावावर एमएमआरडीएकडून तब्बल 50 कोटी खर्च करून विद्युत झगमगाटाचा बेत आखण्यात आला आहे. यासंदर्भातील निविदा प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. दरम्यान आता हा एवढा खर्च पुन्हा कशासाठी असा प्रश्न उपस्थित झाला असून निवडणुकीच्या तोंडावर उधळपट्टी करण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सहा हेक्टरचे पाणथळ क्षेत्र असलेल्या मासुंदा तलावावर आमदार निधी, खासदार निधी, सरोवर संवर्धन निधी, महापालिकेचा निधी, स्मार्ट सिटीचा निधी असा विविध माध्यमातून आधीच खर्च झालेला आहे. तरीही पुन्हा एकदा मासुंदा तलावावर एमएमआरडीएच्या माध्यमातून आणखी सुमारे 50 कोटींपर्यंतचा खर्च होत असल्याचे समोर आले आहे. मासुंदा तलावाच्या विद्युत सुशोभिकरणासाठी 49 कोटी 61 लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये सुमारे 35 कोटी 57 लाख रुपये खर्च करून तलावामध्ये संगीत आणि प्रकाश योजनेसह कारंजे आणि लेझर शोची निर्मिती करण्यात येणार आहे. तर तलावामध्ये 71 लाख 19 हजार रुपये खर्च करून तरंगत्या व्यासपीठाची निर्मितीचा प्रस्ताव आहे. या अवास्तव खर्चाला विरोधकांनी मात्र प्रचंड विरोध केला आहे. भाजप आमदार संजय केळकर यांनी प्रशासनावर टीका केली आहे.
50 कोटींमध्ये काय काय केले जाणार?
- तलावाच्या सुरक्षेसाठी सीसीटिव्हीही कॅमेऱ्याचे जाळे आणि ध्वनीक्षेपण यंत्रणेवर 66 लाख 48 हजार 822 रूपये
- तलावाच्या सभोवतालच्या संरक्षण भिंतीवर शोभिवंत प्रकाश योजनेचा खर्च 1 कोटी 6 लाख 50 हजार इतका असणार आहे.
- तर विद्युत पुरवठा, जनित्र, प्रकल्प व्यवस्थापनावर 2 कोटी 21 लाख 71 हजार आणि यंत्रणा चालवण्यासाठी चार वर्षाच्या दुरुस्ती व देखभालीसाठी 91 लाख असा 42 कोटी 4 लाख आणि जीएसटीची रक्कम मिळून 49 कोटी 61 लाख रुपयांच्या खर्च केला जाणार आहे. याबाबतच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.