ठाणे: आधीच्या मुख्यमंत्र्यांकडे इतका रिकामा वेळ होता की ते पंढरपूरला कारनं जायचे, असं म्हणत खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तर सत्तास्थापनेबद्दलही त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. राम मंदिर हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं, ते स्वप्न पूर्ण करणाऱ्यांशी आम्ही युती केली, असंही श्रीकांत शिदे म्हणाले. श्रीकांत शिंदे यांनी आज कल्याणमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं होतं. त्या मेळाव्यात त्यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. 


बाळासाहेबांचे विचार विकणारे तुम्ही. तुम्ही गद्दार. खोक्याचा जप इतका आहे, आगोदर खोके यायचे आता खोके बंद झाले म्हणून खोक्यांचा जप. इतके लोक का सोडून गेले याचा विचार त्यांनी करायला पाहिजे. कुणी आला की तो गद्दार. आपत्ती आली की शिंदे साहेब, निवडणूक आली की शिंदे साहेब.  शिंदे साहेबांनी शिवसेना वाढवली. मग आता शिंदे साहेब इतकं खुपायला का लागले?


खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांनी म्हटले होते की मी जर काँग्रेस बरोबर गेलो किंवा मला जर जायची वेळ आली की माझं दुकान बंद करेन. ज्यांच्या नावाने मतं मागितली त्यांच्या राज्यभिषेक सोहळ्याला आले नाहीत. ज्यांनी राम मंदिर बांधलं त्यांच्यासोबत आम्ही युती केली. 


आदित्य ठाकरे यांच्यावर टीका 


श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेल यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, आपला नेता आपल्या बरोबर कसा वागतो ते दाखवण्यासाठी काही जणांना घेवून गेलो. त्या ठिकाणी बसलो. 20- 25 मिनिटांनी एक माणूस टेस्टिंगचे किट घेवून आला. आमची कोरोना टेस्ट केली, टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर युवराज भेटले अशी परिस्थिती होती. मला हे बोलायचं नव्हतं पण तुम्ही लोकांना कसं वागवलं हे समोर आलं पाहिजे. 


गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीत भाजप आणि शिंदे गटात वाद पाहायला मिळतोय. भाजप आमदार रवींद्र चव्हाण आणि शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात वाद असल्याचं स्पष्ट दिसत होतं. त्यातच आज कल्याणमध्ये लोकग्राम पादचारी पुलाच्या भूमिपूजनाला श्रीकांत शिंदे उपस्थित होते. मात्र रवींद्र चव्हाण अनुपस्थित असल्यानं अजूनही वाद मिटला नसल्याची चर्चा  सुरु झाल्या. वादाबद्दल श्रीकांत शिंदेंना विचारलं असता युतीत सर्वकाही आलबेल आहे, रवींद्र चव्हाणांचे वेगळे कार्यक्रम असल्यानं ते अनुपस्थित होते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर आम्हाला ज्या सूचना केल्या आहेत त्याचं पालन आम्ही करतोय असं रवींद्र चव्हाण म्हणाले. 


दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दोन गटातील कार्यकर्त्यांना निर्देश दिले आहेत. आम्हाला ज्या सूचना केल्या आहेत त्याचं पालन आम्ही करतोय. विकास कामांना सर्व आमदारांनी उपस्थित राहणं अपेक्षित नसतं, स्थानिक आमदार असतील ते चालतं अशी प्रतिक्रिया राज्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे. 


ही बातमी वाचा: