Kalyan Local Train : धावत्या लोकलसमोर उडी मारुन आत्महत्या केल्याच्या घटना नव्या नाहीत. मात्र रेल्वे रुळावर (Railway Track) ठाण मांडून बसलेल्या तरुणाचा जीव मोटरमनच्या (Motorman) सतर्कतेमुळे वाचला. कल्याणमध्ये (Kalyan) ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


काय आहे प्रकरण?


कल्याण रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी (12 जून) सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. एक मद्यपी तरुण थेट रेल्वे रुळावर ठाण मांडून बसला होता. सुदैवाने लोकल ट्रेनच्या मोटरमनचे त्याच्याकडे लक्ष गेलं. प्रसंगावधान राखत मोटरमनने ट्रेन थांबवली. आत्महत्या करण्यासाठी हा तरुण रेल्वे रुळावर ठाण मांडून बसला होता. मात्र मोटरमनच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचला. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


... अन् प्रसंगावधान राखत मोटरमनने लोकल ट्रेन थांबवली


सोमवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म नंबर 1 हून सीएसएमटीच्या दिशेने लोकल निघाली. मात्र रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर रेल्वे रुळावर एक तरुण ठाण मांडून बसल्याचे लोकलच्या मोटरमनच्या लक्षात आलं. प्रसंगावधान राखत मोटरमनने लोकल ट्रेन थांबवली. मोटरमनने खाली उतरुन तरुणाला बाजूला केलं आणि लोकल सुरु करुन मार्गस्थ झाले. मद्यप्राशन केलेला हा तरुण आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळावर बसला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. मात्र तो आत्महत्या का करत होता याची माहिती मिळालेली नाही. 


कल्याण लोहमार्ग पोलिसांना या घटनेबाबत विचारले असता मोटरमनने परस्पर त्या तरुणाला तिथे उपस्थित प्रवाशांच्या ताब्यात दिलं आणि लोकल मुंबईच्या दिशेला घेऊन रवाना झाले. त्यामुळे या तरुणाच्या कृत्याबाबत लोहमार्ग पोलिसांसह आरपीएफ पोलिसांकडे कोणतीही नोंद नाही. या तरुणाचा शोध घेतला असता तो थांबला नाही, अशी माहिती लोहमार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी एबीपी माझाच्या प्रतिनिधीला फोनद्वारे दिली. 


शिवडीत मोटरमनने लोकलचा ब्रेक लावल्याने व्यक्तीचा वाचला जीव


अशाच प्रकारची घटना दीड वर्षांपूर्वी मुंबईतील शिवडी स्टेशनजवळ घडला होता. शिवडीतील एका व्यक्तीने रेल्वे रुळावर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकलच्या मोटरमनने वेळेवर लोकलचा ब्रेक लावल्याने या व्यक्तीचा जीव वाचला. त्यानंतर महिला पोलीस आणि महिला होमगार्डने आत्महत्या करणाऱ्याला रुळावरुन उचलून बाजूला ठेवलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. 


हेही वाचा


लोकल थांबवून मोटरमनची लघुशंका, व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल