Kalyan : गेल्या तीन महिन्यापासून शिवसेनेत शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष सुरु आहे. हा संघर्ष संपूर्ण राज्य पाहत आहे.  दोन्ही गटाकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली जात नाही. मात्र कल्याण त्याला अपवाद ठरलं आहे. ठाकरे गटातील पदाधिकार्यासाठी शिंदे गटातील आमदाराने मदतीचा पुढे केला आहे. ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखाला पोलिसांकडून तडीपारची नोटीस मिळाल्यानंतर शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर व माजी नगरसेवक हे त्यांच्या मदतीसाठी धावले आहेत. आमदार भोईर यांनी डीसीपीची भेट घेत साळवी यांच्या विरोधात कोणतीही अन्यायकारक कारवाई होऊ नये, अशी मागणी केली आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे गटातील पदाधिकारी हर्षवर्धन पालांडे यांच्यावर हल्ला झाला होता, त्यावेळी देखील शिंदे गटाकडून डीसीपी गुंजाळ यांची भेट घेत हललेखोरावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.


राज्यात सत्ता संघर्षाची लढाई एकीकडे कोर्टात सुरु असताना दुसरीकडे कल्याणमध्ये एक वेगळे राजकारण पाहावयास  मिळाले आहे. काही दिवसापूर्वी ठाकरे गटाचे कल्याण महानगर प्रमुख आणि कल्याण मुरबाड शिवसेना जिल्हा प्रमुख विजय साळवी यांना पोलिसांकडून तडीपारची नोटिस पाठविण्यात आली. साळवी यांना पोलिसांकडून त्यांचे प्रतिउत्तरासाठी वेळ देण्यात आली. यावेळी साळवी यांनी ही कारवाई सूडबूद्धीने होत असल्याचा आरोप केला होता. साळवी यांनी शेकडो समर्थकांसह एसीपी कार्यालयात जाऊन त्यांचा जबाब नोंदविला आहे.


पोलिसात हे प्रकरण सुरु असताना थेट शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर शिंदे गटातील माजी नगरसेवक रवी पाटील, जयवंत भोईर, प्रभूनाथ भोईर, सुनिल वायले, श्रेयस समेळ नगरसेवकांसोबत डीसीपी सचिन गुंजाळ यांची भेट घेतली. या वेळी विश्वनाथ भोईर यांनी  विजय साळवी आणि आमचे पारिवाराचे संबंध आहे. आम्ही दोघे एकत्रित काम केले आहे. ही कारवाई सूडबुद्धी केली गेली नाही. विजय साळवी यांना त्यांची बाजू मांडण्याची पूर्ण संधी द्यावी आणि सर्व कायदेशीर बाबी तपासून त्यांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तर विजय साळवी यांच्यावर कारवाई करण्यामध्ये शासनाचा कोणताही हस्तक्षेप नाही की कोणताही आकस नाही. तसेच अशा कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अजिबात वेळ नसल्याचेही आमदार भोईर यांनी स्पष्ट केले. त्यांच्या विरोधात राजकीय गुन्हे दाखल आहेत. ही रूटीन प्रोसेस आहे. मात्र विजय साळवी यांच्या वर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी पोलिसांनी याची दक्षता घ्यावी. विश्वनाथ भोईर यांच्या या पाऊलामुळे राजकीय वर्तुळात  एकच चर्चा रंगली आहे.