Mumbra Conversion Case Latest Update: मुंब्रा धर्मांतर प्रकरणावरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंब्र्यात 400 सोडा, धर्मांतर झालेली चार नावं तरी दाखवा असं आव्हान त्यांनी उत्तर प्रदेशच्या पोलिसांना दिलं आहे. राज्याची निवडणूक जिंकण्यासाठी हे कुठल्या थराला नेलं जात आहे, मुंब्र्याला हाताला धरुन ठाण्याचं वातावरण बिघडवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाची दखल राज्याच्या पोलिस महासंचालकांनी घ्यावी असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. 1 जुलै रोजी मुंब्रा बंद करण्याचा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये मोबाईलमधील ऑनलाईन गेमिंगद्वारे धर्मातर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महत्त्वाचं म्हणजे गाझियाबादमधल्या या धर्मांतराचं कनेक्शन महाराष्ट्रातील मुंब्र्याशी जोडण्यात येत आहे. मुंब्र्यात 400 जणांचं धर्मांतर करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऑनलाईन धर्मांतर करणाऱ्या मुख्य आरोपीनं हा गौप्यस्फोट केल्याचं डीसीपी निपुण अग्रवाल यांनी सांगितलंय. मोबाईल गेमच्या आडून ब्रेन वॉश करत धर्मांतर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दुसरा आरोपी शाहनवाज फरार आहे. गाझियाबाद पोलीस शाहनवाजची आई मुमताजचा जबाब मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्याची शक्यता आहे.
Mumbra Conversion Case : जितेंद्र आव्हाडांची टीका
या सर्व प्रकरणावर टीका करत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, गाझियाबादमधील आयपीएस अधिकाऱ्याने मुंब्र्यात धर्मांतर झाल्याचं सांगितलं. परंतु धर्मांतर केलेल्या 400 पैकी 4 जणांची तरी नावं सांगावी. तर याची दखल राज्याच्या पोलीस महासंचालकांनी घ्यावी.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राज्यात जे काही सुरू आहे ते शासन पुरस्कृत आहेत. गाझियाबाद येथील IPS अधिकाऱ्याने धर्मांतर झाल्याचं सांगितलं. त्यांनी 400 हा आकडा सांगितला आहे, पण त्यापैकी चार तरी नावं त्यांनी द्यावीत. मुंब्र्याला हाताला धरून ठाण्यातील वातावरण बिघडवायचं काम सुरू आहे. त्याचा परिणाम, त्याचा फटका इथल्या आर्थिक व्यवहारांवर होत आहे. कोणीतरी बेअक्कल अधिकारी काहीही बोलतो, पण त्याच्या वक्तव्याचं खंडन ठाण्याच्या पोलिस आयुक्तांनी केलं पाहिजे. महाराष्ट्रातली निवडणूक जिंकण्यासाठी हे लोक कोणत्या थराला जाणार आहेत?
महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकांनी आणि ठाण्याच्या पोलिस आयुक्तांनी सांगावं की हे आरोप खोटे आहेत, अन्यथा आम्ही 1 जुलै रोजी मुंब्रा बंद करु. मुंब्य्राला सर्व धर्मीय आणि सर्व जातीय इतिहास आहे, त्याला बदनाम करु नका. अन्यथा आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार.
ही बातमी वाचा :