ठाणे : जय जवान गोविंदा पथकाने प्रताप सरनाईकांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीत 10 थर लावून विश्वविक्रम केला. जय जवान पथकाने दिवसभरात हा दुसऱ्यांचा विक्रम केला. विशेष म्हणजे सकाळी प्रताप सरनाईकांनी जय जवान पथकाला टोमणा मारला होता, त्याच सरनाईकांच्या दहीहंडीत जय जवान पथकाने 10 थरांचा विश्वविक्रम केला.
राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानकडून ठाण्यामध्ये दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये सकाळी कोकण नगर गोविंदा पथकाने जय जवान पथकाचा विक्रम मोडत 10 थरांचा नवा विक्रम केला. पण अवघ्या काहीच वेळात जय जवानने घाटकोपरमध्ये 10 थरांचा विक्रम केला.
सरनाईकांचा जय जवान पथकाला टोमणा
कोकण नगर गोविंदा पथकाच्या विक्रमानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी जय जवान पथकाचे नाव न घेता त्यांना टोमणा हाणला होता. काही गोविंदा पथकांना वाटतं आमचा विश्वविक्रम कोणीच मोडणार नाही असं सरनाईक म्हणाले. त्याच सरनाईकांच्या दहीहंडी कार्यक्रमात जय जवानने पुन्हा एकदा 10 थरांचा विक्रम केला.
Jai Jawan Govinda Pathak World Record : 'जय जवान'ने करुन दाखवलं
जय जवान पथकाने पहिल्यांदा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केला आणि दुसऱ्यांदा ते यशस्वी झाले. जय जवान पथकाने एकाच दिवसात दोन वेळा 10 थरांचा विक्रम केला. 'गोविंदा पथकांचे खरे राजे आम्हीच' असा दमदार संदेश जय जवान पथकानं या थरारक कामगिरीतून दिला आहे.
कुणी कोणती हंडी फोडली?
माजी खासदार राजन विचारे यांची ठाण्यातली धर्मवीर आनंद दिघे स्मृतिप्रीत्यर्थ 1 लाख 11 हजार 111 रूपये मनाची दहीहंडी ठाण्याच्या प्रमुख पाच गोविंदा पथकांनी एकत्र येऊन फोडली. गौरीशंकर पथक, ओम साई पथक, सिद्धिविनायक पथक, श्रीनगरचा राजा पथक, साईबा गोविंदा पथक यांनी एकत्र मिळून दहीहंडी फोडली.
जय लहुजी गोविंदा पथकाने भारतातील सर्वात मोठी दहीहंडी राम कदम घाटकोपरचा मान पटकावलं असून 6 मनोरे रचत दहीहंडी फोडली आहे.
पुण्यातील पुनीत बालन यांची दहीहंडी राधाकृष्ण ग्रुप गोविंदा पथकाने 7 थर लाऊन फोडली. त्यांना एक लाख 11 हजार रुपये बक्षीस देण्यात आलं आहे.
भिवंडीतली कपिल पाटील फाउंडेशन यांची मानाची हंडी चोरोबा कोनगाव यांनी ही दहीहंडी फोडली आहे.
नवी मुंबई - ऐरोलीमधील शिवसेना उपनेते विजय चौगुले आयोजित दहीहंडी स्वराज्य गोविंदा पथक , चिंचपाडा यांनी फोडली
पिंपरी चिंचवडमध्ये चेंबूर येथील संयुक्त प्रतिष्ठान गोविंदा पथकाकडून दहीहंडी फोडण्यात आली, सात थर लावून ही दहीहंडी फोडली. राम वाकडकर युथ फाउंडेशन कडून या दहीहंडीचे आयोजन करण्यात आलं होतं
शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वेंद्वारे आयोजित बोरीवलीच्या मागाठाण्याची दहिहंडी गावदेवी मित्र मंडळाने पाच थर लाऊन फोडली.