ठाणे : घोडबंदर रोडवरील गायमुख घाटातील रस्त्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गणेश नाईक यांच्याकडे असलेल्या वनखात्यावर चांगलेच भडकल्याचं दिसून आलं. हा रस्ता काँक्रीटचा का केला नाही? त्याचे डांबरीकरण का केलं? असे प्रश्न शिंदेंनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना विचारले. लोकांच्या जीवापेक्षा तुम्ही मोठे नाही, अपघात झाल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल होणार नाही या गैरसमजात राहू नका असा इशारा एकनाथ शिंदे यांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना दिला.
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख घाटात काही दिवसांपूर्वी रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा न करता डांबराचा का केला असा प्रश्न शिंदेंनी बैठकीत विचारला. वन परिसरात काँक्रीटचा रस्ता बांधण्याची परवानगी वन खातं देत नाही असं कारण सार्वजनिक बांधकाम विभागानं दिलं. त्यावरून एकनाथ शिंदे वन अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले.
लोकांच्या जीवापेक्षा तुम्ही मोठे नाही
लोकांच्या जिवापेक्षा तुम्ही मोठे नाही, तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ताबडतोब सांगा. घोडबंदर रस्त्यावर सिमेंटचा रस्ता बांधण्यास परवानगी द्या. नाहीतर अपघात झाल्यास तुम्हाला जबाबदार धरलं जाईल. तुमच्यावर गुन्हे दाखल करणार नाही या गैरसमजात राहू नका अशा शब्दांत शिंदेंनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं.
Maharashtra Forest Department : वनखात्याकडून परवानगी नाही
गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता लोकांच्या डोकेदुखीचं कारण ठरला आहे. त्यामुळे हा रस्ता डांबरीकरण सोडून त्याचं काँक्रीटीकरण का करण्यात आलं नाही असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना विचारला. त्यावर अधिकाऱ्यांनी वनखात्याकडून परवानगी नसल्याचं सांगितलं.
एकनाथ शिंदे यांनी ताबडतोब वनखात्याच्या अधिकाऱ्यांना फोन केला. त्यावर ही जमीन वनखात्याची असल्याने ही परवानगी देण्यात येत नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यावर एकनाथ शिंदे चांगलेच भडकले. हा रस्ता काँक्रीटचा करण्यास परवानगी द्या, अन्यथा अपघात झाल्यास तुम्हाला जबाबदार ठरवलं जाईल असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.
Eknath Shinde Vs Ganesh Naik : एकनाथ शिंदे-गणेश नाईकांमध्ये सुप्त संघर्ष?
राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्यात सुप्त संघर्ष असल्याचं दिसून येतंय. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईवर एकहाती वर्चस्व निर्माण केलं होतं. आता फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी गणेश नाईकांना मंत्रिपद देऊन बळ दिलं. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये सुप्त राजकीय संघर्ष सुरू झाल्याची चर्चा आहे.