ठाणे : दुपारच्या दरम्यान डोंबिवलीमध्ये झालेल्या एका स्फोटामुळे (Dombivli MIDC Blast) सगळेच हादरून गेले. डोंबिवली एमआयडीसीतील एका केमिलक कंपनीतील स्फोट झाल्याची घटना घडली. हा स्फोट इतका भयंकर होता की त्याच्या बॉयलर्सचे तुकचे दीड किमीपर्यंत उडाले आणि आजूबाजूच्या सोसायट्यांच्या काचाही फुटल्या. 


भूकंप झाल्याची लोकांना भीती


डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीत झालेल्या स्फोटामुळे दीड किलोमीटरमधील गाड्यांच्या आणि बिल्डिंगच्या काचा फुटल्या आहेत. एखादा भयंकर भूकंप झाल्याप्रमाणे लोक भीतीने पळत होते. आजुबाजूच्या परिसरातील एकाही सोसायटीच्या काचा राहिलेल्या नाहीत, सगळ्या काचा फुटून गेल्या आहेत. यामुळे अनेक लोक जखमी झाले आहेत. मोठी मनुष्यहानी झाली असावी अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. 


बॉयलर्सचे जे तुकडे उडाले ते दीड किलोमीटर अंतरावर पडले आहेत. हे तुकडे चारचाकी गाड्यांवर पडून गाड्या दबल्या आहेत, अशी माहिती स्थानिक रहिवाशी संजय चव्हाण यांनी दिली.


डोंबिवलीतील स्फोटाची तीव्रता एवढी होती की, डोंबिवली एमआयडीसी भागात दीड ते दोन किलोमीटर लांबच्या सोसायटीतील बिल्डिंग बाहेर एक कार उभी होती, त्या कारवर बॉयलरचा तुकडा जाऊन पडला. त्यामुळे कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. डोंबिवली एमआयडीसी रहिवासी विभागात अनेक इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. 


कंपनीला लागलेल्या या स्फोटामुळे आजूबाजूच्या कंपन्यांनाही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. सध्या अग्निशमन दलाकडून आग नियंत्रण आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. एमआयडीसीच्या आजुबाजूच्या परिसरात स्फोटाच्या हादऱ्याने पडझड झाल्याचे दिसत आहे.


डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीच्या परिसरात धुराचे लोट आणि आगीची तीव्रता इतकी जास्त आहे की, अग्निशमन दलाच्या जवानांना कंपनीच्या गेटवरुनच पाण्याचा मारा करावा लागत आहे. कंपनीत अजूनही रसायनांचे अनेक ड्रम आहेत. आगीमुळे या ड्रमचा स्फोट होत आहे. त्यामुळे आग कमी होताना दिसत नाही. आगीची धग कमी झाल्याशिवाय अग्निशमन दलाला आतमध्ये शिरता येणे शक्य नाही.


कोणतीही जीवितहानी नाही


डोंबिवलीतील एमआयडीसी स्फोटानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, घटनास्थळी रेस्क्यू टीम, जिल्हाधिकारी आणि खासदार पोहोचले आहेत. सध्या तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे.या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


ही बातमी वाचा: