ठाणे : डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी (Dombivli MIDC Explosion) पहिली अटक झाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मालती मेहता यांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मालती मेहता या अमुदान कंपनीच्या मालक असून नाशिकमधील मेहेरधाम परिसरातून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. बॉयलर स्फोटप्रकरणी कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवलीतील रिअॅक्टर स्फोटात मृतांचा आकडा 8 वर पोहोचला आहे.
डोंबिवली येथील एमआयडीसीतील अमुदान स्फोटातील मुख्य आरोपी मालती मेहता या नाशिक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी रात्रीपासून नाशिक क्राईम ब्रांच युनिट एक आणि आणि ठाणे क्राईम ब्रांच पोलिसांनी संयुक्त पद्धतीने कारवाई करत त्यांना अटक केली आहे.
नाशिकमध्ये नातेवाईकाच्या घरी आश्रय
डोंबिवलीमध्ये स्फोट झाल्यानंतर अमुदान कंपनीचे मालक हे फरार झाले होते. त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक विश्षणाच्या आधारे त्यांच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस केलं आणि नाशिकमधून त्यांना शोधून काढलं. आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवलीतील कंपनीत स्फोट झाल्यानंतर मुख्य आरोपी मालती मेहता या नाशिकमध्ये पोहोचल्या होत्या. त्यांनी त्यांच्या नातेवाईकाच्या घरी आश्रय घेतला होता.
पोलिसांच्या टीमने त्यांना अटक केली असून त्यांना नाशिकमधील शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर प्रक्रिया पार पाडून त्यांना मुंबईच्या दिशेने नेण्यात येणार आहे.
डोंबिवलीतील अमुदान कंपनीत रिअॅक्टरचा स्फोट झाल्यानं दुर्घटना झाल्याचं समोर आलं आहे. या कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाल्याचं सुरूवातीला सांगण्यात येत होतं. पण नंतर अग्निशन दलाने या कंपनीत रिअॅक्टरचा स्फोट झाल्याचं स्पष्ट केलं आहे. डोंबिवली एमआयडीसीत 90 बॉयलर आहेत.
आमच्या जमिनी घेऊन आमचाच गळा घोटला, स्थानिक रहिवाशांची तक्रार
डोंबिवलीत केमिकल फॅक्ट्रीत झालेल्या स्फोटानंतर येथे रहिवाशांनी केमिकल कंपनी हटावची भूमिका घेतली आहे. केमिकलं कंपन्यांमुळे या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आमच्याच जमिनी घेऊन त्यावर कंपन्या उभारल्या, मात्र त्याच कंपन्या आमचा गळा घोटत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी दिली.
डोंबिवलीत केमिकल फॅक्ट्रीत झालेल्या स्फोटानंतर स्थानिक रहिवाशांचे मोठं नुकसान झाले आहे. याचं सर्वेक्षण करण्यासाठी केडीएमसीचे कर्मचारी नुकसान झालेल्या रहिवाशी इमारतींची पाहणी करत आहेत.
ही बातमी वाचा: