ठाणे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे (Ramesh Mhatre) यांना विष्णूनगर पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. 'माझा फोन का उचलला नाही?' या किरकोळ कारणावरून शासकीय रुग्णालयात घुसून कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. 

Continues below advertisement

दरम्यान, अटक केल्यानंतर रमेश म्हात्रे यांना वैद्यकीय तपासणीसाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, तेथे तपासणी दरम्यान त्यांची तब्येत अचानक खालावली. रमेश म्हात्रे यांना हृदयाचा त्रास (Heart Issue) होत असल्याने त्यांना तातडीने ठाणे सिव्हिल रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. केडीएमसीच्या रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने पोलिसांवर म्हात्रे यांना ठाणे सिव्हिलला पाठवण्याची वेळ आली.

Shiv Sena Corporator Arrested : नेमकं प्रकरण काय? महिला डॉक्टरला धक्काबुक्की

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात रमेश म्हात्रे यांच्या प्रभागातील एका गर्भवती महिलेला उपचारासाठी आणण्यात आले होते. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार न करता तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला (Refer) दिला. या पार्श्वभूमीवर संतापलेल्या म्हात्रे यांनी रुग्णालयात फोन केला होता. रुग्णालयातील डॉक्टरने फोन उचलला नाही या क्षुल्लक कारणावरून म्हात्रे यांनी आपल्या समर्थकांसह थेट रुग्णालय गाठले आणि तिथे मोठा गोंधळ घातला.

Continues below advertisement

यावेळी रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना आणि नर्सला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर एका महिला डॉक्टरला अरेरावी करत धक्काबुक्की आणि दमदाटीही करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त केला गेला. याप्रकरणी पोलिसांनी रमेश म्हात्रे यांच्यासह त्यांचे समर्थक रमेश पवार, प्रमोद निकम आणि अक्षय कारंडे या तिघांनाही विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे.

Ramesh Mhatre Hospitalised : रमेश म्हात्रेंची दिलगिरी

या संपूर्ण प्रकरणावरून सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही रमेश म्हात्रेंच्या कृत्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे, विरोधी पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी थेट डोंबिवली गाठली आणि डॉक्टरांची भेट घेतली. सत्तेतल्या नगरसेवकांच्या या अशा 'माजोरड्या' नगरसेवकावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, चौफेर टीका झाल्यानंतर नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी या प्रकरणावर आपली बाजू मांडत दिलगिरी व्यक्त केली आहे. "मी महिला डॉक्टरवर हात उगारला नाही. आम्ही गंभीर विषयावर बोलत असताना त्या महिला डॉक्टर सतत फोनवर बोलत होत्या, म्हणून मी केवळ त्यांच्या हातावर फटका मारला," असा दावा म्हात्रे यांनी केला आहे. मात्र, म्हात्रे यांनी केवळ माफी मागून चालणार नाही, तर सरकारी डॉक्टरांवर हात उचलणाऱ्या अशा लोकप्रतिनिधींवर कायद्यानुसार कडक कारवाई झालीच पाहिजे, अशी आक्रमक मागणी आता सर्वसामान्य नागरिक आणि डॉक्टर संघटनांकडून केली जात आहे.

ही बातमी वाचा: