डोंबिवली: मराठी माणसाचे शहर अशी ओळख असणाऱ्या डोंबिवलीत मराठी माणसांवर काही परप्रांतीय लोकांनी दादागिरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. डोंबिवलीच्या नांदिवली परिसरात मराठी आणि अमराठी असा वाद उफाळला. डोंबिवली नांदीवली मधील एका सोसायटीत सत्यनारायण व हळदीकुंकू समारंभाला अमराठी कुटुंबीयांनी विरोध केला. तसेच मराठी माणसांना उद्देशून अपशब्द वापरल्याचा आरोप सोसायटीत राहणाऱ्या मराठी कुटुंबांतील महिलांनी केला आहे . सोमवारी रात्री या सोसायटीत या वादातून मोठा गोंधळ झाला. या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे. पोलिसांकडून सध्या याप्रकऱणाचा तपास सुरु आहे.
या घटनेनंतर सोसायटीतील मराठी भाषिक महिलांनी संताप व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, आम्ही स्वखर्चाने हळदी कुकूंचा कार्यक्रम आयोजित केला होता. सोसायटीकडे कोणत्याही प्रकारचा खर्च मागितला नव्हता. तरीही संबंधित अमराठी व्यक्तीकडून कार्यक्रमाला विरोध करण्यात आला. संबंधित अमराठी व्यक्तीने सोसायटीच्या व्हाट्स अॅप ग्रुपमध्ये सत्यनारायणाची पूजा आणि हळदी-कुंकूच्या कार्यक्रमाला विरोध केला. त्यानंतर आम्ही महिला सोसायटीच्या आवारात एकत्र जमलेल्या असताना त्या व्यक्तीने तिथे येऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यातून हा वाद उफाळला. अखेर या प्रकरणी आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार करायला आलो आहोत, असे या महिलेने सांगितले.
खोलीचं एग्रीमेंट संपल्यामुळे मराठी माणसाला परप्रांतीयांकडून अपमानास्पद वागणूक
रायगड जिल्ह्यातल्या पनवेल तालुक्यातील भोकरपाडा भागातील एका मराठी कुटुंबाला परप्रांतीय कुटुंबाकडून सातत्याने त्रास दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भाडेकरू मराठी कुटुंबाचे येथील सोसायटी मधील रहाण्याचे कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर घरमालकाने त्यांच्याकडील छोटं मुल असल्यामुळे त्यांना राहण्याची आणखी मुभा दिली होती. मात्र ,सोसायटीतील परप्रांतीय चेअरमन महिलेकडून रूम सोडण्यासाठी या कुटुंबावर सातत्याने दबाव टाकण्यात आला. शिवाय या कुटुंबाशी भांडण करून मराठी माणसाची इथे राहण्याची लायकी नाही अशा स्वरूपातील वाद घालत त्यांना शिवीगाळ करण्यात आल्याचं गायकवाड कुटुंबाचे म्हणणं आहे.
या घटनेनंतर मनसेने या प्रकरणात उडी मारली आहे. शिवाय घडलेल्या घटनेचा परप्रांतीय कुटुंबाला जाब विचारला यासंदर्भात मराठी कुटुंबाची माफी मागण्यास या परप्रांतीय महिलेला भाग पाडलं. पुन्हा मराठी माणसाच्या वाटेला गेला तर पळवून पळवून मारु, असा सल्लड दम मनसेच्या रायगड जिल्ह्याध्यक्षा आदिती सोनार यांनी दिला.
काही दिवसांपासून शर्मा नावाच्या सेक्रेटरीची सातत्याने तक्रार येत होती. एक तर परप्रांतीय, महाराष्ट्रात राहून आमच्या मराठी माणसाला त्रास दिला. तीन दिवसांपूर्वी शर्माने मराठी माणसांना जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच पोलिसांना पैसे देऊन तुम्हाला इथेच जमिनीवर गाडू, अशा प्रकारची भाषा शर्माकडून वापरण्यात आली. या परप्रांतीयांची एवढी मजल जातेच कशी? हे पाहण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. त्याला आम्ही माफी मागायला लावली. महाराष्ट्रात राहून मराठी माणसाच्या नादी लागू नका, असा इशारा मनसेच्या जिल्हाध्यक्षा आदिती सोनार यांनी दिला.
आणखी वाचा