मुंबई: राज्यातील महायुती सरकारमध्ये आणखी एका मंत्र्‍यांचा समावेश झाला असून राजभवन येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यापूर्वी झालेल्या महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यात छगन भुजबळ यांचं नाव वगळण्यात आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. तर, भुजबळ यांनी देखील जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली होती. मात्र, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता छगन भुजबळ यांची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यावरुन, आता पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) आणि छगन भुजबळ आमने सामने आले आहेत. भुजबळांच्या मंत्रिमंडळातील सहभागवारुन मनोज जरांगे यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं. त्यानंतर, भुजबळ यांनीही जरांगेंवर प्रतिहल्ला करत जरांगेमुळेच मराठा समाजाला त्रास झाल्याचं म्हटलं आहे.

अजित पवार हे जातीयवादी लोकं पोसायचं काम करत आहेत, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली होती. त्यावर, भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''ह्या जरांगेनेच एवढ्या मोठ्या चुका अन् खेळ्या केल्या आहेत. मनोज जरांगे यानेच सगळ्यात जास्त मराठा समाजाचे नुकसान केलं आहे, त्याच्यामुळेच गावागावात वाद लागले आहेत, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. तसेच, खरंतर मराठा समाज हा सगळ्यात मोठा बांधव म्हणून महाराष्ट्रात राहतो, पण ह्या जरांगेच्या कर्तृत्वामुळेच निश्चितपणे मराठा समाजालाच त्रास झालाय,'' असेही भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले. 

काय म्हणाले मनोज जरांगे

छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली किंवा नाही घेतली हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. छगन भुजबळ मंत्री झाले याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही. अजित पवार जातीयवादी लोकं पोसायचं काम करत आहेत, असं मनोज जरांगे म्हणाले. तसेच अजित पवार प्रचंड मोठी चूक करत आहेत. याच्या परिणामाला त्यांना सामोरे जावं लागेल, असा थेट इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला. 

भुजबळांकडून सर्वांचे आभार

दरम्यान, राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाल्याने मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्यात अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. मात्र, महायुती सरकार मोठ्या बहुमताने पुन्हा सत्तेत आल्यानंतर भुजबळांचा पत्ता कट झाला होता. त्यामुळे भुजबळांसह ओबीसी नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मतदारसंघात जनतेशी संवाद, समता परिषदेच्या जागोजागी सभा, मेळावे घेत भुजबळांनी त्यावेळी आपली भूमिकाही मांडली होती. छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त करताना अजित पवारांनाही लक्ष्य केलं होतं. पण, अजित पवारांची साथ सोडली नव्हती, आता भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्‍यांचे त्यांनी आभार मानले. 

हेही वाचा

मोठी बातमी! राज्याचं नवं गृहनिर्माण धोरण जाहीर; मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय