ठाणे : सध्याच्या धावपळीच्या जीवनात लवकर सकाळी उठून नायरी अथवा पोट भरण्यासाठी नरम पाव आणि कडक पाव दुकानात विक्रीसाठी सहज उपलब्ध असतो. त्यामुळे चहा पावसह  वडापाव, समोसा पाव. पाव भाजी आदी खाद्य पदार्थ आपल्या सकाळी नाश्तासाठी, जेवणासाठी आपल्या जीवनाचा घटक बनले आहेत. मात्र रोजच्या खाण्यातील नरम पावमध्ये जर मेलेली पाल ( House Lizard) न बघताच खाल्ली तर आपल्या आरोग्यावर काय परिमाण होतील हे सांगल्याच नको. अशीच घटना भिवंडी शहरात समोर आली आहे. दुकानातून खरेदी केलेल्या  पावात मृत अवस्थेत पाल ( HouseLizard) आढळली. या घटनेने भिवंडी (Bhiwandi News) शहरात एकच खळबळ उडाली आहे.  


विशेष म्हणजे पाव खाण्याआधीच तो पाव खरेदी करणाऱ्या त्या कुटुंबाच्या  निदर्शनास ही धक्कादायक बाब आल्याने पुढील अनर्थ टाळला आहे. ही घटना भिवंडी शहरातील रोशन बाग परिसरात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रोशनबाग परिसरात मोहम्मद वसीम मोहम्मद सलीम हे कुटुंबासह राहतात. त्यातच आज सकाळच्या सुमारास सलीम यांनी परिसरातच असलेल्या कोहिनूर स्वीट दुकानातून आठ नरम पावची एक लादी खरेदी केली होती. त्यानंतर सलीमसह त्यांचे कुटूंब पावा सोबत नाश्ता करण्याची बसले असता, त्यापूर्वीच त्यांनी खाण्यासाठी पाव तोडून घेताच, त्यांना पावात मेलेली पाल आढळून आल्याने त्यांना धक्काच बसला.


त्यांनी तातडीने ज्या दुकानातून पाव खरेदी केले होते. ते दुकान गाठले. त्यांनी दुकान मालकाला पावात मेलेली पाल निघाल्याचे सांगितले. मात्र त्यावेळी दुनाकात मालक हजर नव्हते. मात्र सलीम यांनी दुकानातील नोकराला बोलावत आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करून तो व्हिडिओ व्हायरल केला. त्यानंतर काहीवेळातच दुकान मालकाने सलीम यांना स्पष्टीकरण दिले. आमची यामध्ये चूक नसून आम्ही हे पाव नारपोली हद्दीत असलेल्या नेशनल बेकरी मधून होलसेल दराने आणून विक्री करत असतो, त्यामुळे ही चूक त्या बेकरीवाल्याची असल्याचे सांगत घडलेल्या घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 


दरम्यान यापुढे पाव खाताना किमान त्यामध्ये मेलेली पाल अथवा झुरळ तर नाही ना याची दक्षता पाव खाणाऱ्या नागरिकांनी द्यावी असे या घटनेवरून समोर आले आहे.