Dahihandi 2023 : संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा (Dahihandi 2023) उत्सव मोठ्या जल्लोषात यावर्षी साजरा झाला. भिवंडी शहरात सुद्धा गोविंदा पथकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. त्यासाठी शहरात लाखो रुपयांच्या बक्षीसांची खैरात असलेल्या दहीहंडी उभारण्यात आल्या होत्या. शिवसेना भिवंडी शहर शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने स्व.आनंद दिघे चौकात आयोजित धर्मवीर मानाची दहीहंडी ठिकाणी डायमंड जिमको चाविंद्रा आणि ज्ञानदीप मित्र मंडळ नागाव या दोन गोविंद पथकांनी आठ थरांची सलामी दिल्याने हे दोन संघ पात्र ठरले होते. परंतु दहीहंडी फोडण्याचा मान चिठ्ठी काढून देण्याच्या निर्णयाला या दोन्ही संघांनी विरोध दर्शवला. त्यामुळं हंडी फोडण्याचा मान दहीहंडीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर शहरात बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना दिला.


पोलीस पथकाला रोख चाळीस हजार रुपयांचे पारितोषिक


डायमंड जिमको चाविंद्रा आणि ज्ञानदीप मित्र मंडळ नागाव  या दोन्ही पथकाच्या वादामुळं फार उशीर झाला. त्यामुळं आयोजक असलेल्या शिवसेना भिवंडी जिल्हाप्रमुख सुभाष माने यांनी या दोन्ही संघांना पारितोषिकाची 1,11,111 रुपयांची रक्कम वितरीत करुन सन्मान चिन्ह दिले. पण हंडी फोडण्याचा मान दहीहंडीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर शहरात बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना दिला. विशेष म्हणजे पोलिसांनी सुद्धा मोठ्या जल्लोषात ही हंडी फोडण्यासाठी मनोरा उभा केला. परंतू हंडी फोडण्याचा मान भिवंडी शहर पोलीस ठाण्यातील असलम शेख या मुस्लिम पोलीस बांधवांस दिला. त्यामुळे भिवंडी शहरात ही दहीहंडी चर्चेचा विषय ठरली आहे. आयोजकांकडून तसेच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही हितचिंतकांकडून पोलीस पथकाला रोख चाळीस हजार रुपयांचे पारितोषिक सुद्धा घोषित करण्यात आले आहे. त्यानंतर दिवसभर बंदोबस्त करून थकलेल्या पोलिसांनी सुध्दा डिजे च्या तालावर ठेका धरत आपला दिवसभराचा ताण कमी केला.


पावसाने दमदार हजेरी, गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला


मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने गोविंदा पथकांचा उत्साह आणखीच शिगेला पोहोचला होता. चाळीतील गल्लींपासून ते राजकीय पक्षांनी आयोजित केलेल्या लाखोंच्या कार्यक्रमात गोविंदांचा उत्साह ओसंडून वाहत होता. काही ठिकाणी आठ थर तर काही ठिकाणी 9 थर रचण्यात आले होते. रात्री 10 वाजेपर्यंत कोणत्याही गोविंदा पथकाला 10 थर लावता आले नाहीत. ठाण्यात 'जय जवान' गोविंदा पथकाने प्रयत्न केला. मात्र, त्यांना अपयश आले.


दहीहंडी उत्सवाला गालबोट


मुंबईत दहीहंडीचा (Dahihandi 2023) उत्साह दिसून येत आहे. मात्र काही ठिकाणी गोविंदा (Govinda) जखमी झाल्याने सणाला गालबोट लागले आहे. मुंबईत रात्री 9 वाजेपर्यंत 107 गोविंदा जखमी झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने (BMC) दिली. यापैकी 14 गोविंदाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, 62 जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. 31 गोविंदावर ओपीडीमध्ये उपचार सुरू आहेत. ही आकडेवारी मुंबई महापालिकेने दिली असून रात्री 9 वाजेपर्यंतची आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत जखमी गोविंदांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तर, ठाण्यात 17 गोविंदा जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यातील कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली. 


महत्त्वाच्या बातम्या:


Dahihandi 2023 : मुंबईत 107 गोविंदा जखमी; 14 जण गंभीर, रुग्णालयात उपचार सुरू, आकडा वाढण्याची शक्यता