ठाणे : जिल्ह्यातील भिवंडीत आगीचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. गेल्या महिन्यात भिवंडी ग्रामीण भागात एकदा पुन्हा अग्नितांडव पाहायला मिळालं होतं. तालुक्यातील कशेळी गावच्या हद्दीत असलेल्या चामुंडा कॉम्पलेक्स परिसरातील फर्निचर मार्केटमध्ये फर्निचरच्या गोदामाला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीत संपूर्ण फर्निचर गोदाम जळून खाक झाले होते. आता, भिवंडी तालुक्यातील तलवली नाका, घरत कंपाउंड परिसरात कापडी चिंध्याच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत कापडी चिंध्याचे दोन गोदाम पूर्णतः जळून खाक झाले आहेत.
भिवंडीतील आगीच्या घटनेची माहिती मिळताच भिवंडी आणि कल्याण अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पाण्याची कमतरता असल्याने आणि आगीले लोट दूरपर्यंत पसरल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यास अडचण निर्माण होत आहे. प्राथमिक माहितीनुसार, गवताला लागलेल्या आगीमुळे ही आग पसरत जाऊन गोदामाला लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सतत प्रयत्न सुरू असून, नेमक आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी किती वेळ लागणार हे अजूनही सांगता येत नाही. दरम्यान, आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलासह स्थानिकांकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, दोन्ही गोदाम हे चिंध्यांच्या कापडाची असल्याने आगीने मोठा पेटला घेतला आहे. त्यामुळे, आग विझवण्यात अडचण येत आहे.