Bhiwandi Latest Marathi News Update : भिवंडी-निजामपूर महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात आठ फुटाचा साप आढळला आहे. भक्ष्याच्या शोधात हा साप आयुक्तांच्या बंगल्यात घुसला होता. यावेळी बंगल्यात असणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातवरण झालं होतं. सापाला पाहून कर्मचारी सैरवैर पळत होते. भिवंडीतील अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या शिताफीनं सापाला पकडले. आयुक्तांच्या बंगला असलेल्या मानसरोवर परिसरात या सापाची सध्या चर्चा सुरु आहे. या सापाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. 


भक्ष्याच्या शोधात आठ फूटाचा साप भिवंडी महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात घुसला. त्यामुळे बंगल्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच पळापळ झाली होती. मात्र भिवंडी अग्निशमन दलाच्या जवानांनी  घटनास्थळी धाव घेऊन या भल्यामोठ्या सापाला मोठ्या शिताफीने सुखरूप पकडले अन् त्याला पिशवीत बंद केले.   


 भिवंडी-निजामपूर महापालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांचे शासकीय निवासस्थान (बंगला)  भिवंडीतील व्हराळ देवी तलाव असलेल्या  मानसरोवर परिसरात आहे. गेल्या काही दिवसापासून मानसरोवर  भागात  मोठमोठी  गृहसंकुल  झपाट्याने  उभी  राहत  आहेत.  त्यामुळे  विषारी,  बिन  विषारी  साप  भक्ष्याच्या  शोधात मानवीवस्तीत  शिरत असल्याच्या  घटना घडतच आहेत.  अशाच  एका  घटनेत  आठ  फूट  लांब  असलेला  साप  आज सकाळच्या सुमारास  अचानक  आयुक्तांच्या बंगल्यात घुसला. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला हा साप प्रथम दिसला. त्याने तातडीने या घटनेची माहिती अधिकाऱ्यांना देताच अधिकाऱ्यांनी भिवंडी अग्निशमन दलाच्या कार्यालयात संपर्क केला आणि आयुक्तांच्या बंगल्यात  भलामोठा  साप  शिरल्याची  माहिती  दिली.  माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जावांनानी आयुक्त बंगल्यात तातडीने दाखल होत या भल्यामोठ्या सापाला 20 मिनिटाच्या अथक प्रयत्नानंतर शिताफीने  पकडून  पिशवीत  बंद  केले.  साप  पकडल्यानंतर आयुक्तांच्या   कुटुंबासह  कर्मचाऱ्यांनी   सुटकेचा निश्वास  घेतला.


 हा  साप  धामण  जातीचा  असून   याची  माहिती   वन  विभागाच्या  अधिकाऱ्यांना  देऊन  या  सापाला  निर्सगाच्या सानिध्यात  सोडल्याची  माहितीही  अग्निशमन अधिकाऱ्यांनी   दिली  आहे.  तसेच  बदलत्या  हवामानामुळे  साप  मानवी  वस्तीत  शिरल्यास  तत्काळ  त्याची  माहिती  सर्पमित्रांना  देण्याचे  नागरिकांना  आव्हान  केले  आहे. दरम्यान  यापूर्वी  सप्टेंबर 2021 रोजी याच बंगल्यात 6 फुटाचा साप तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांना रात्रीच्या सुमारास बंगल्यात शिरताना दिसला होता.  त्यांनीच पालिकेच्या अधिकाऱ्यांना  याबाबत माहिती  दिली असता, अग्निशमन   दलाचे   जवान  घटनास्थळी  दाखल  होऊन  त्या 6  फुटाच्या सापाला पकडले होते.