ठाणे : भिवंडीतील अन्सार मोहल्ल्यात पाच वर्षीय आहिद एजाज अन्सारी याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 16  डिसेंबर रोजी घराजवळ खेळत असताना आहिद हरवला होता. दोन दिवसांच्या शोधानंतर त्याचा मृतदेह एका मोडकळीस आलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत सापडला.


आहिदचे वडील एजाज अन्सारी हे पावरलूम कारखान्यात मुकादम म्हणून काम करतात. 16 डिसेंबर रोजी संध्याकाळी नमाज अदा केल्यानंतर त्यांनी आहिदला बोलवण्यासाठी बहिणीला पाठवले. मात्र तो सापडला नाही. रात्री उशिरापर्यंत कुटुंबीयांनी व स्थानिक रहिवाशांनी शोध घेतला. शेवटी शांती नगर पोलिस ठाण्यात आहीद बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.


पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले तसेच सोशल मीडियावरही मुलाच्या हरवल्याची माहिती पसरवण्यात आली. स्थानिकांनीही पोलिसांना सहकार्य करत आहिदचा शोध घेतला. मात्र 18 डिसेंबर रोजी सायंकाळी त्याचा मृतदेह एका एका मोडकळीस आलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत सापडल्याने साऱ्या परिसरात खळबळ उडाली. सध्या मृतदेह शव विच्छेदनासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. 


आहिद पाण्याच्या टाकीत कसा पोहोचला, यामागील सत्य शोधण्यासाठी पोलिस तपास करत आहेत. ही घटना अपघात आहे की दुसऱ्या कोणत्यातरी कृत्याचा परिणाम, यावरही तपास सुरू आहे. या घटनेमुळे आहिदच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून अन्सार मोहल्ल्यात शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेने शहरातील मुलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


ही बातमी वाचा: