बदलापूर : बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटनेविरोधात नागरिक सकाळपासून आक्रमक झाले आहेत. साडे आठ तासांपासून बदलापूर रेल्वे स्टेशनमध्ये आंदोलन सुरु आहे. या प्रकरणी आरोपीला फाशी द्यावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. आंदोलकांची समजूत काढण्यासाठी राज्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) दाखल झाले. आंदोलकांची समजूत काढण्याचा गिरीश महाजन यांनी प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आलं नाही. दुसरीकडे या प्रकरणात दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले.
गिरीश महाजन यांच्याकडून समजूत काढण्याचा प्रयत्न
गिरीश महाजन यांनी आंदोलकांना राज्य सरकारनं तुमच्या सर्व मागण्या मान्य केल्याची माहिती दिली. यावेळी महिलांनी प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी गिरीश महाजन यांना केली. माझी तुम्हाला नम्र विनंती आहे,तुमच्याप्रमाणं आमच्या भावना देखील तीव्र आहेत. तुम्ही तरुण आहात, सुशिक्षित आहात, कायद्याप्रमाणं आपण आरोपींवर कारवाई करु, असं आवाहन गिरीश महाजन यांनी केलं. थोड्या वेळात अंधार होईल, आपण आंदोलन थांबवावं, अशी विनंती महाजन यांनी केलं.
गिरीश महाजन यांनी आंदोलकांची एक तासापासून समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना आंदोलन मागं घेण्याची विनंती केली. मात्र, आंदोलक ऐकण्यास तयार नसल्यानं गिरीश महाजन बदलापूर रेल्वे स्टेशनमधून निघाले.आंदोलकांमधील काही लोक राजकीय हेतून आल्याचं म्हटलं. तिथं लाडकी बहीण योजनेचे पोस्टर्स हाती दिसून आले, असं महाजन म्हणाले. तरुणांचा राग योग्य आहे पण रेल्वे लाईन बंद करुन चालणार नाही. या प्रकरणी पोलिसांना निलंबित केलंय. मुख्याध्यापकांना निलंबित केलं आहे. हे प्रकरण फास्टट्रॅकवर टाकलेलं आहे, अशी माहिती देखील गिरीश महाजन म्हणाले. चर्चेतून मार्ग निघेल, असं गिरीश महाजन म्हणाले. इथं जमलेले तरुण एका गावचे नाहीत, स्थानिकही दिसत नाहीत, असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं. लाखो लोकांना नोकरीवरुन घरी जायचं आहे. किती वेळ रेल्वे रोखून धरणार, आरोपीला इथं आणा आणि मारुन टाका, हे कायद्याला धरुन नाही, असं गिरीश महाजन म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांची मोठी कारवाई, पोलीस अधिकारी निलंबित
बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत.
संबंधित बातम्या :