मुंबई : व्हिडीओ शेअर करुन, त्यातून कमाई करण्यासाठी पाच वर्षांपूर्वी यूट्यूबने सर्वांसाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिला. त्यानंतर सर्वांनाच यूट्यूब स्वत:चं यूट्यूब चॅनेल सुरु करुन पैसे कमावणं शक्य झालं होतं. मात्र, आता यूट्यब चॅनेलवर 10 हजार लाईफटाईम व्ह्यूज होत नाहीत, तोपर्यंत पैसे कमावता येणार नाहीत. म्हणजेच यूट्यूबच्या पार्टनर प्रोग्राममध्ये सहभागी होता येणार नाही.


जरी तुमच्या यूट्यूब चॅनेलवर 10 हजार व्ह्यूजचा टप्पा पार झाला, तरी यूट्यूबच्या नव्या नियमांनुसार संपूर्ण चौकशी केली जाईल. त्यानंतर ठरवलं जाईल, संबंधित यूट्यूब चॅनेलवरुन पैसे कमावले जाऊ शकतात की नाही.

स्कॅम आर्टिस्ट म्हणजे चोरलेलं कंटेट यूट्यूबवर अपलोड करुन पैसे कमावणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे अशा चोरांना लगाम लावण्यासाठी नवे नियम यूट्यूबकडून तयार करण्यात आले आहेत.

यूट्यूबच्या प्रॉडक्ट मॅनेजमेंटचे व्हॉईस प्रेसिडंट एरियल बार्डिन यांनी ब्लॉग पोस्टमधून याबाबत माहिती दिली.

“यूट्यूब पार्टनर प्रोग्रामसाठी अर्ज करणाऱ्या क्रिएटर्ससाठी आता नवीन रिव्ह्यू प्रोसेस आणली जाईल. क्रिएटर्सच्या यूट्यूब चॅनेलवर 10 हजार व्ह्यू पूर्ण झाल्यानंतर कंपनीच्या धोरणांनुसार संबंधित चॅनेलच्या व्हिडीओचं निरीक्षण केलं जाईल. चॅनेलवर सर्वकाही योग्य दिसल्यास क्रिएटरचा यूट्यूब पार्टनर प्रोगाममध्ये समावेश करुन घेतलं जाईल आणि जाहिराती दिल्या जातील. अशामुळे नियमांनुसार जाणारे क्रिएटर्स पैसे कमावू शकतात.”, असे एरियल बार्डिन यांनी ब्लॉगमध्ये सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वीच आक्षेपार्ह कंटेटसोबत आपल्या प्रॉडक्टची जाहिरात दाखवली जाते, अशी तक्रार करत 250 हून अधिक ब्रँडनी अॅड कॅम्पेन मागे घेत यूट्यूबला राम राम केला. त्यानंतर यूट्यूबने या सर्व प्रकाराची दखल घेत नियमांमध्ये मोठे बदल करण्याचे ठरवले.