मुंबई : ट्रायच्या आदेशानंतर रिलायन्स जओने समर सरप्राईज ऑफर मागे घेतली. मात्र, ‘धन धना धन’ नावाची समर सरप्राईजसारखीच नवी ऑफर लॉन्च केली. समर सरप्राईज ऑफरचा ज्यांना लाभ घेता आला नाही, त्यांच्यासाठी खास जिओने ही ऑफर आणली आहे. ज्यांनी समर सरप्राईज ऑफर घेतली आहे, ते यूजर्स मात्र ही ऑफर घेऊ शकणार नाही.
एक ऑफर... दोन वेगवेगळे रिचार्ज !
धन धना धन ऑफर दोन वेगवेगळ्या प्रकारात विभागली आहे. जे आधीपासूनच जिओचे प्राईम मेंबर आहेत, त्यांच्यासाठी वेगळा रिचार्ज आणि जे प्राईम मेंबर नाहीत किंवा नव्याने सिम खरेदी केले आहेत, त्यांच्यासाठी वेगळा रिचार्ज आहे.
प्राईम मेंबर असणाऱ्यांना ऑफरचा काय फायदा?
जिओ प्राईम मेंबरना धन धना धन ऑफरमधील 309 रुपयांच्या रिचार्जमध्ये तीन महिन्यांसाठी दररोज 1 जीबी 4G डेटा, तर 509 रुपयांच्या रिचार्जमध्ये तीन महिन्यांसाठी दररोज 2 जीबी 4G डेटा मिळेल. या दोन्ही रिचार्जवर तीन महिन्यांसाठी मोफत व्हॉईस कॉलिंग, अनलिमिटेड एसएमएस, जिओ अॅप्स या सुविधाही मिळतील. मोफत डेटा लिमिट संपल्यानंतर नेट स्पीड 128 kbps होईल.
नवीन सिम किंवा प्राईम मेंबर नसणाऱ्यांना ऑफरचा काय फायदा?
जिओ प्राईम मेंबर नसणाऱ्यां किंवा नवीन जिओ सिम घेतलेल्यांना 99 रुपये अधिकचे मोजावे लागतील. म्हणजेच प्राईम मेंबरना 309 रुपयांना मिळणारी ऑफर, इथे 408 रुपयांना आहे. तर 509 रुपयांची ऑफर 99 रुपये अधिकचे मोजून 608 रुपयांना आहे. शिवाय, मोफत व्हॉईस कॉलिंग, अनलिमिटेड एसएमएस, जिओ अॅप्स या सुविधाही मिळतील.
‘समर सरप्राईज’साठी ‘धन धना धन’ महागडी ऑफर
धन धना धन ऑफरमध्ये प्राईम मेंबरना 309 रुपये, 509 रुपये मोजावे लागतील, तर प्राईम मेंबर नसणाऱ्यांना 408 रुपये आणि 608 रुपये मोजावे लागणार आहेत. समर सरप्राईज ऑफरमध्ये हेच प्लॅन 402 रुपये आणि 602 रुपयांना होते. म्हणजेच धन धना धन ऑफर समर सरप्राईजपेक्षा 6 रुपयांनी महाग आहे.
15 एप्रिलपर्यंत घेता येणार प्राईम मेंबरशीप
जिओनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, प्राईम मेंबरशीप घेण्यासाठी 15 एप्रिल ही शेवटची तारीख आहे. पण प्राईम मेंबरशीप घेणाऱ्या यूजर्सना समर सरप्राईज ऑफरचा फायदा मिळणार नाही. पण हे यूजर्स प्राईम मेंबर झाल्यानंतर 303 रुपयांचं रिचार्ज करुन 28 दिवसांपर्यंत दररोज 1 जीबी 4जी डेटा वापरु शकतात.
समर सरप्राईज ऑफर काय होती ?
31 मार्चला जिओनं घोषणा केली होती की, ज्यांनी प्राईम मेंबरशीप घेतली आहे त्यांना 30 जूनपर्यंत 1जीबी / 2जीबी फ्री डेटा वापरता येणार होता. ज्यांनी 99 रुपये भरुन प्राईम मेंबरशीप घेतली आणि 303 रुपयांचं रिचार्ज केलं त्यांना ही ऑफर मिळणार होती. सरप्राईज ऑफरमध्ये यूजर्सला पहिल्याप्रमाणे अनलिमिटेड कॉलिंग मिळणार होतं. 15 एप्रिलपर्यंत सरप्राईज ऑफर घेता येत होती. मात्र, TRAI त्याच्यावर बंदी घातली.
https://twitter.com/reliancejio/status/851764667949228032