मुंबई : 2017 या वर्षात मोबाईल वापरणारांसाठी खुशखबर म्हणजे इंटरनेट वापरणं हे आता स्वस्त झालेलं आहे. दिवसाला 1Gb डेटा वापरणं म्हणजे सहज गोष्ट झाली आहे. त्यात भर म्हणजे व्हॉईस कॉलिंग आणि मेसेजही डेटा पॅकसोबत मिळत आहेत. सर्वच दूरसंचार कंपन्या ग्राहकांवर मेहेरबान होण्याचं कारण म्हणजे रिलायन्स जिओच्या ऑफर्स.. जिओने आणलेल्या प्लॅनने या कंपन्यांना आपले दर कमी करण्यास भाग पाडलं.


एका वर्षापूर्वी इंटरनेट वापरणं हे पैशावाल्यांचं काम समजलं जात होतं. 1Gb डेटा वापरण्यासाठी जवळपास चारशे ते साडेचारशे रुपये लागायचे. या 1Gb डेटाची किंमत पाचशेच्या घरात असून तो महिनाभर पुरवून वापरावा लागयचा. मध्येच डेटा संपला तर पुन्हा खर्च वाढायचा म्हणून इंटरनेट न वापरलेलं बरं असं अनेकांचं मत असायचं. मात्र जिओच्या एंट्रीनंतर ही सर्व परिस्थिती पूर्ण वेगळी झाली.

जिओच्या ऑफर आणि दूरसंचार क्षेत्र

जिओने दूरसंचार क्षेत्रात 5 सप्टेंबर 2015 रोजी पाऊल ठेवलं. वेलकम ऑफर अंतर्गत तीन महिन्यांसाठी दिवसाला 4GB 4G डेटा, मोफत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि मेसेज अशी ही ऑफर होती. जिओचं सिम घेण्यासाठी ग्राहकांच्या उड्या पडल्या होत्या. तासनतास रांगेत थांबूनही सिम मिळत नव्हतं. ही ऑफर 31 डिसेंबर 2016 ला संपली आणि लगेच आली ती हॅप्पी न्यू ईयर ऑफर.. जिओच्या लाँचिंगनंतर अगोदरच ग्राहक इतर दूरसंचार कंपन्यांना सोडून जिओचं सिम घेत होते. त्यातच ही नवी ऑफर आणून जिओने दुसरा मोठा धक्का दिला. पहिले मोफत सहा महिने संपल्यानंतर ग्राहकांनी जिओची साथ सोडली नाही. प्राईम मेंबरशिप घेत स्वस्त डेटा पॅक घेणं पसंत केलं. त्यामुळे दूरसंचार कंपन्यांची धास्ती अजूनच वाढली.

जिओने देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या एअरटेललाही तोडीस तोड दिली. एअरटेलनेही याचा धसका घेत डेटा प्लॅनमध्ये कपात केली आणि त्यानंतर लगेच दूरसंचार कंपन्यांमध्ये दर कमी करण्याची जणू स्पर्धाच सुरु झाली. व्होडाफोन, आयडिया आणि एअरटेलने ग्राहकांनी कनेक्शन बदलू नये, यासाठी कंबर कसली. मात्र परवडणाऱ्या डेटा दरांमुळे ग्राहकांना जिओने आकर्षित केलं होतं. याचाच परिणाम म्हणून सध्या जिओच्याच किंमतीत इतर कंपन्याही डेटा देतात.

जिओने पहिल्या सहा महिन्यात 10 कोटी ग्राहक जोडले आणि हा वेग फेसबुक ट्विटर यांच्यापेक्षाही जास्त आहे, असं रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जिओला 5 सप्टेंबर 2017 ला एक वर्ष पूर्ण झालं त्यादिवशी सांगितलं होतं.

मोफत व्हॉईस कॉलिंग

फोनवर बोलणं हे एकेकाळी महागडं समजलं जायचं. पण जिओने VoLTE सेवा देत हा समज मोडून काढला. डेटाद्वारेच केल्या जाणाऱ्या या कॉलिंगमुळे फोनवर बोलणं मोफत झालं. डेटाच्याच प्लॅनमध्ये कॉलिंगही मिळाल्यामुळे ग्राहकांनी डेटा वापरणं थांबवलं नाही. याचाच फायदा जिओला झाला. काही दिवसांपूर्वी ही गरज ओळखत एअरटेलनेही मुंबईतून VoLTE सेवा लाँच केली. जिओचा ग्राहकांना झालेला हा दुसरा फायदा होता, जेव्हा एअरटेलने VoLTE सेवा आणली. एसटीडी आणि लोकल कॉलसाठी इतर कंपन्यांचे वेगवेगळे दर असायचे. राज्यातून बाहेर गेलं की रोमिंग लागायचं. जिओने ही प्रथाही बंद केली आणि मोफत एसटीडी आणि लॉकल व्हॉईस कॉलिंगची सुविधा दिली.

डेटा वापण्यात भारत 150 क्रमांकाहून अव्वल स्थानावर

जिओच्या लाँचिंगपूर्वी भारताचा डेटा वापरणाऱ्या देशांमध्ये 150 वा क्रमांक होता. मात्र जिओच्या मोफत डेटा ऑफरनंतर भारत पहिल्या क्रमांकावर आला, असा दावा जिओने केला होता. जिओ येण्यापूर्वी भारतात महिन्याला 20 कोटी GB डेटा वापरला जायचा, तर आता हा आकडा 120 कोटी GB झाला.

स्वस्त फोन आणत सर्वांना 4G इंटरनेट

जिओची VoLTE सेवा असल्यामुळे ती केवळ 4G फोनमध्येच चालणं शक्य होतं. मात्र प्रत्येकाला 4G फोन घेणं शक्य होत नसल्याने जिओने नवी आयडिया शोधली. 1500 रुपये अनामत रक्कम ठेवून जिओने मोफत 4G फीचर फोन आणला. हा फोन खरेदी करण्याच्या अटी काही ग्राहकांना मान्य नसल्या तरी ज्यांना 4G स्मार्टफोन घेणं शक्य नाही त्यांनी हा फोन घेतलाच. जिओने नवा फोन आणल्यानंतर एअरटेलनेही स्वस्त फोन आणला. दोन्ही कंपन्यांनी स्वस्त फोन देण्यासाठी सुरु केलेल्या स्पर्धेचा फायदा ग्राहकांना झाला.

नव्या वर्षात स्वस्त डेटा देण्यासाठी चढाओढ

नव्या वर्षात ग्राहकांना स्वस्त डेटा ऑफर देण्यासाठी दूरसंचार कंपन्यांची स्पर्धा सुरु झाली आहे. जिओने हॅप्पी न्यू ईयर प्लॅन 2018 जाहीर केल्यानंतर व्होडाफोननेही क्षणाचाही विलंब न करता आपला प्लॅन जाहीर केला. व्होडाफोन आणि जिओनेही प्रत्येकी दोन प्लॅन आणत ग्राहकांना स्वस्त डेटा वापरण्याची संधी दिली आहे.

जिओच्या हॅप्पी न्यू ईयर प्लॅन 2018 मध्ये 199 रुपये आणि 299 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. हॅप्पी न्यू ईयर प्लॅन 2018 जास्त डेटाची गरज असणाऱ्या ग्राहकांसाठी आहे. जिओच्या प्राईम मेंबर्सनाच केवळ या प्लॅन्सचा लाभ घेता येईल.

199 रुपयांच्या प्लॅनमध्ये जिओच्या ग्राहकांना दररोज 1.2 GB डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. त्यामुळे ग्राहकांना दररोज 1.2GB डेटा वापरता येईल.

यापेक्षाही जास्त डेटा लागत असेल तर 299 रुपयांचा प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा मिळणार आहे. शिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि मेसेज मिळणार आहेत. 28 दिवसांसाठी याची व्हॅलिडिटी असेल.

व्होडाफोनच्या नव्या प्लॅनमध्ये पहिला प्लॅन 198 रुपयांचा आहे. ज्यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 मेसेज आणि दररोज 1GB 4G/3G डेटा मिळणार आहे. व्होडाफोनच्या केवळ प्रीपेड ग्राहकांनाच या प्लॅनचा लाभ घेता येणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची असेल.

198 रुपयांच्या प्लॅनशिवाय व्होडाफोनने प्रीपेड ग्राहकांसाठी 229 रुपयांचा प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्येही 198 रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच सुविधा मिळतील, मात्र 1GB डेटाऐवजी दररोज 2GB डेटाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. म्हणजेच महिन्याला ग्राहकांना 56GB डेटा मिळणार आहे.

दरम्यान, एअरटेलनेही 199 रुपयांचा प्लॅन आणला आहे. ज्यामध्ये 28 दिवसांसाठी दररोज अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 मेसेज आणि दररोज 1GB 4G/3G डेटा मिळणार आहे. जिओच्या प्लॅननंतर सर्व कंपन्यांनी प्लॅनची घोषणा केली.

नव्या वर्षात जिओचा डेटा महागणार?

जिओने पहिले सहा महिने मोफत आणि नंतर पेड सेवा दिली. मात्र ऑक्टोबर 2017 पासून आतापर्यंत दोन वेळा डेटा पॅकच्या किंमतींमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे नव्या वर्षातही जिओ डेटा पॅकची किंमत वाढवण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.