चीनमध्ये जगातील पहिल्या डिझायनर बाळाचा जन्म : शास्त्रज्ञांचा दावा
एबीपी माझा वेब टीम | 27 Nov 2018 03:23 PM (IST)
येत्या काही वर्षात एखाद्या सिनेतारकासारखी दिसणाऱ्या बाळांची किंवा अतिशय बुद्धीमान शास्त्रज्ञांप्रमाणे बुद्धी असलेली बाळांचीही ऑर्डर केली जाईल आणि त्यानुसार कदाचित पुरवठाही होईल.
मुंबई : तुम्हाला गुटगुटीत, सुदृढ बाळ हवंय? तुम्हाला निरोगी, गोंडस बाळ हवंय? अगदी सुंदर...टवटवीत फुलांसारखं? आता तुम्हाला हव्या तशा बाळाचा जन्म होऊ शकतो. होय... जेनेटिकली मॉडिफाईड किंवा डिझायनर बाळं आता तुम्हालाही होऊ शकतात. 21 शतकाच्या सुरुवातीला ‘The Future of Human Nature' या पुस्तकातून मानवाचा अमर्याद आकांक्षांचा पुढचा टप्पा लिहिण्यात आला आहे. या पुस्तकात बायोटेक्नॉलॉजी आणि जेनेटिक सायन्सच्या माध्यमातून हवं तसं मूल जन्माला घालावं, अशी भीती व्यक्त केली होती. अगदी काही वर्षांच्या कालावधीतच ही भीती खरी ठरलीय, कारण चिनी शास्त्रज्ञांनी डीएनएत बदल करुन एचआयव्ही आणि कॉलरासारख्या रोगांपासून मुक्त असं बाळ जन्माला घातल्याचा दावा केला आहे. अर्थात या प्रयोगाचा उद्देश डिझायनर बाळ तयार करणं नसून रोगमुक्तीच्या दिशेने पहिलं पाऊल आहे असा लंगडा युक्तिवाद शास्त्रज्ञांकडून केला जात आहे. पण या प्रयोगाचं भविष्य कितीही टोकाचं असू शकतं येत्या काही वर्षात एखाद्या सिनेतारकासारखी दिसणाऱ्या बाळांची किंवा अतिशय बुद्धीमान शास्त्रज्ञांप्रमाणे बुद्धी असलेली बाळांचीही ऑर्डर केली जाईल आणि त्यानुसार कदाचित पुरवठाही होईल. या प्रयोगाबद्दल माहिती प्रसारित झाल्यावर जगभरात आश्चर्यकारक प्रतिक्रिया नक्कीच उमटत आहेत. काही शास्त्रज्ञ अतिशय सावध प्रतिक्रिया देतात आहेत, तर काही मात्र याला नैसर्गिक प्रक्रियेत ढवळाढवळ मानत आहेत. मानवी शरीर आणि त्याला घडवण्याऱ्या निसर्गाच्या किमयेला हा प्रयोग नक्की आव्हान देणारा आहे. मात्र या यशस्वी प्रयोगाचा उपयोग मानवी कल्याणासाठी व्हावा आणि विध्वंसासाठी नको, सध्या तरी एवढीच अपेक्षा आपण करु शकतो.